। लोकजागर । फलटण । दि. 16 डिसेंबर 2025 ।
ग्रामीण भागातील युवकांना आधुनिक डिजिटल युगाशी जोडून त्यांना सक्षम करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल टाकण्यात आले आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED), सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण तालुक्यातील पहिल्या डिजिटल मार्केटिंग प्रशिक्षण बॅच चा उत्साहात शुभारंभ झाला आहे. या उपक्रमामुळे फलटण तालुका डिजिटल कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळकपणे अधोरेखित झाला आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन दि. १० डिसेंबर २०२५ रोजी वेदांत अकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पवार गल्ली, कसबा पेठ, फलटण येथे पार पडले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करताना MCED चे राज्य व्यवस्थापक मा. श्रीकांत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी डिजिटल मार्केटिंग हे केवळ एक माध्यम नसून, भविष्यातील करिअरसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचप्रमाणे, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक मा. प्रथमेश कुलकर्णी यांनीही युवकांनी या डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून स्वयंरोजगाराच्या दिशेने पाऊल टाकावे, असे आवाहन केले.
या उद्घाटन समारंभाला अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्री. मनोज मिरासदार, फलटण–वाई–खंडाळा समन्वयक श्री. अविनाश कुलकर्णी, MCED सातारा जिल्हा अधिकारी मा. सौ. शीतल पाटील, तसेच वेदांत अकॅडमीचे संस्थापक श्री. स्वानंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. विशेष म्हणजे, ज्येष्ठ पत्रकार श्री. रवींद्र बेडकिहाळ यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. त्यांनी ग्रामीण पातळीवर डिजिटल साक्षरतेचे महत्त्व विशद करत, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम दि. १० डिसेंबर ते १६ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजित असून, यामध्ये निवडलेल्या २० प्रशिक्षणार्थींना सोशल मीडिया व्यवस्थापन, डिजिटल ब्रँडिंग, कंटेंट क्रिएशन, गुगल टूल्स आणि उद्योजकतेसाठी डिजिटल माध्यमांचा वापर असे महत्त्वाचे विषय शिकवले जाणार आहेत.
MCED आणि AMRUT यांच्या या संयुक्त प्रयत्नातून फलटण तालुक्यात ग्रामीण डिजिटल सक्षमीकरणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या प्रशिक्षणामुळे युवकांमध्ये रोजगारनिर्मितीची संधी तर वाढेलच, पण ते उद्योजकतेच्या दिशेनेही नवीन मार्ग खुले करू शकतील. स्थानिक युवकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत प्रशिक्षणाबद्दल मोठा उत्साह व्यक्त केला आहे. भविष्यात अमृत संस्था आणि MCED यांनी फलटण तालुक्यात आणखी रोजगाराभिमुख, तांत्रिक आणि स्टार्टअपसंबंधित प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे तालुक्यातील युवकांना कौशल्य विकासासाठी सातत्याने संधी उपलब्ध होतील.
