फलटणमध्ये आज ‘सभेचा धुरळा’! मुख्यमंत्री फडणवीस विरुद्ध गुलाबराव पाटलांची तोफ धडाडणार; राजकीय वातावरण एकदम ‘टाईट’!

। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे दि. १८ डिसेंबर २०२५ ।

फलटण नगरपालिका निवडणुकीचा आता खरा ‘क्लायमॅक्स’ आलाय! २० डिसेंबरला मतदान आणि २१ ला निकाल लागणार असल्यानं आजचा दिवस फलटणकरांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. शहरात प्रामुख्याने भाजपा-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा काटाजोड सामना रंगला असून, मतदारांना आपल्याकडं ओढण्यासाठी दोन्ही बाजूने आज मोठा ‘राजकीय शो’ होणार आहे. सकाळी मुख्यमंत्र्यांची सभा तर संध्याकाळी शिवसेनेचा तोफखाना धडाडणार असल्यानं फलटणच्या गल्लीबोळात सध्या फक्त निवडणुकीचीच चर्चा सुरू आहे.

आज सकाळी ९ वाजताच छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गाजणार आहे. भाजपाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांसाठी मुख्यमंत्री कोणता ‘बुस्टर डोस’ देतात, याकडं सगळ्यांचं लक्ष लागलंय. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभेच्या माध्यमातून जनमत आपल्या बाजूने फिरवण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने प्रचारात किती जोर येतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

दुसरीकडं, संध्याकाळी ५ वाजता गजानन चौकात शिवसेनेची भव्य जाहीर सभा होत आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या साथीदारांच्या प्रचारासाठी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि आमदार निलेश राणे मैदानात उतरणार आहेत. गुलाबराव पाटलांची गावरान तोफ आणि निलेश राणेंची फटकेबाजी मतदानापूर्वी शिवसेनेसाठी किती अनुकूल ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेनं या सभेच्या माध्यमातून शहरात मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे.

थोडक्यात सांगायचं तर, आज फलटणकरांचा ‘मूड’ सेट करण्यासाठी दोन्ही आघाड्यांनी कंबर कसली आहे. कुणाची सभा प्रभावी ठरणार? कुणाचं भाषण मतदारांच्या काळजाला भिडणार? आणि निवडणुकीचं वारं नक्की कुणाच्या दिशेनं फिरणार? याबाबत चौकाचौकात उलट-सुलट चर्चा रंगल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचा ‘राजकीय अनुभव’ चालणार की शिवसेनेचा ‘झंझावात’ बाजी मारणार, याचं उत्तर आता मतदानाच्या पेटीतूनच मिळणार आहे.

Spread the love