फलटण नगरपालिका निवडणूक: ‘रणजितदादांचे व्हिजन आणि समशेरदादांचा अनुभव’ हे विकासाचे उत्तम समीकरण; मुख्यमंत्र्यांची फलटणमध्ये गर्जना
। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. १८ डिसेंबर २०२५ ।
“नगरपालिकेच्या निवडणुकीत मी अनेक सभा केल्या, पण मी कुठेही कुणावर वैयक्तिक टीका केली नाही. माझ्याकडे विकासाचा स्पष्ट कार्यक्रम आहे. मी जे करून दाखवले आहे आणि जे मी भविष्यात करणार आहे, त्यावरच मी बोलतो. कुठलीही टीका न करता खऱ्या अर्थाने परिवर्तन करण्यासाठी आणि सकारात्मक मत मागायला मी इथे आलो आहे. तुमचं एक सकारात्मक मत या शहराला सातारा जिल्ह्यातील सर्वात आधुनिक शहर बनवू शकतं,” असे ठाम प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भाजपा-राष्ट्रवादी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, बाळासाहेब सोळस्कर, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर, यांसह महायुतीचे सर्व उमेदवार आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विकासाचे व्हिजन आणि विरोधकांवर प्रहार
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, “रणजितदादांकडे विकासाचे व्हिजन आहे आणि समशेरदादांना नगरपालिकेचे कामकाज उत्तम समजते, हे फलटणसाठी एक चांगले समीकरण आहे. मतदानाआधी विरोधकांकडून पुष्कळ चिखलफेक होईल, पण चिखलाने कमळाला काहीच फरक पडत नाही; उलट चिखलामध्येच कमळ अधिक डौलाने उभे राहते. तुम्ही २० तारखेला आमची काळजी घ्या, पुढची ५ वर्षे तुमची काळजी मी घेतो,” असे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले.
लाडकी बहीण आणि लखपती दीदी योजना
महिलांच्या योजनांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जोपर्यंत तुमचा हा ‘देवाभाऊ’ जिवंत आहे, तोपर्यंत ‘लाडकी बहीण’ योजना कोणीही बंद करू शकणार नाही. समशेरदादांनी नगराध्यक्ष झाल्यानंतर लखपती दीदी योजनेच्या माध्यमातून फलटणमधील लाभार्थी बहिणींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
शहराचा कायापालट आणि निधीचा ओघ
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी शहर विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यात आपले सरकार आल्यानंतर आपण त्या योजनांना गती दिली. “शहराच्या परिवर्तनासाठी दिलेला पैसा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी नगराध्यक्षासह संपूर्ण नगरपालिका महायुतीच्या ताब्यात देणे क्रमप्राप्त आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विनंतीवरून फलटणमधील न्यायालयाच्या इमारती एकाच ठिकाणी आणण्याचे काम लवकरच पूर्ण केले जाईल. तसेच नाईकबोमवाडी एमआयडीसीमध्ये उद्योग आणल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा शब्दही त्यांनी यावेळी दिला.
डॉक्टर तरुणी प्रकरण : रणजितदादांना क्लिन चिट
पीडित डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री कमालीचे आक्रमक झाले. “या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणे अत्यंत अशोभनीय आहे. या प्रकरणातील सर्व पुरावे आता हाती आले असून आरोपींना कडक शासन केले जाईल आणि पीडितेच्या कुटुंबाला पूर्ण मदत दिली जाईल. या प्रकरणाशी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा दुरान्वये संबंध नाही,” असे त्यांनी ठामपणे स्पष्ट करून विरोधकांचे आरोप खोडून काढले.
ना. जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘इथले सत्ताधिश विकासकामांवर बोलत नाहीत. यापूर्वी काय केलं आहे? पुढे काय करणार आहेत? हे ते सांगत नाही. त्यांच्याकडे सांगायला काहीच नाही. ते फक्त टिका करत आहेत.’’
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले, ‘‘मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेल्या कामांचा आढावा घेवून विरोधी पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कधीही फलटणमध्ये नसतात. त्यांना फलटणची नगरपालिका माहित नाही. त्यांच डिपॉजीट घालवायला आपण थाडं कमी पडत आहोत. आपण जर ताकद लावली तर आपण ते घालवू शकतो. कुणाच्या वारशाची ही निवडणूक नाही तर सर्वांच्या अडचणी सोडवण्याची ही निवडणूक आहे.’’
‘‘रणजितदादा कमीत कमी वेळात जास्त निधी आणून फलटण शहर सर्व सुविधांयुक्त करतील. फलटण शहर बारामतीच्या तोडीस तोड निर्माण होईल’’, असा विश्वास आ. सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
या सभेला फलटण परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
