। लोकजागर । सातारा / पुणे । दि. २४ डिसेंबर २०२५ ।
लेखक, प्रकाशक आणि वाचक यांच्यातील दुवा अधिक घट्ट करण्यासाठी साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. संमेलनस्थळी येणाऱ्या प्रत्येक साहित्यरसिकाला ग्रंथदालनांमधूनच मुख्य मंडपात प्रवेश करावा लागणार आहे. या नियोजनबद्ध रचनेमुळे पुस्तकांचे प्रदर्शन आणि विक्रीला मोठे बळ मिळणार असून, प्रकाशकांची होणारी कुचंबणा थांबणार आहे.
या संदर्भात माहिती देताना ग्रंथदालन समितीच्या प्रमुख सुनिताराजे पवार म्हणाल्या की, अनेकदा संमेलनांमध्ये ग्रंथदालने मुख्य मंडपापासून दूर असल्याने वाचकांची तिथे वर्दळ कमी असते, ज्याचा फटका पुस्तक विक्रीला बसतो. हे टाळण्यासाठी साताऱ्यात अशा पद्धतीने मंडप उभारणी केली जात आहे की, रसिक ग्रंथदालनांमधून फिरतच मुख्य व्यासपीठापर्यंत पोहोचतील. सातारकरांमध्ये आधीपासूनच वाचन संस्कृती रुजलेली असल्याने या संकल्पनेला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रकाशक आणि विक्रेत्यांची विशेष काळजी
केवळ विक्रीच नव्हे, तर ग्रंथ विक्रेते, प्रकाशक आणि स्टॉलवरील कर्मचाऱ्यांच्या निवासाची व भोजनाची सोयही स्वतंत्रपणे करण्यात आली आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रकाशकांचे आर्थिक गणित महत्त्वाचे असल्याने, त्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची ठोस खबरदारी संयोजकांनी घेतली आहे.
२४२ गाळ्यांची नोंदणी पूर्ण; शनिवारी पुण्यात सोडत
ग्रंथदालनासाठी २५४ गाळे उपलब्ध करण्यात आले असून, हे सर्व गाळे ‘जर्मन हँगर’ पद्धतीचे (९ फूट बाय ९ फूट) असतील. यापैकी २४२ गाळ्यांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित १२ गाळे शासन आणि परिषदेच्या संलग्न संस्थांसाठी राखीव ठेवले आहेत. नोंदणी झालेल्या गाळ्यांची अधिकृत सोडत (Lottery) शनिवार, दि. २७ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात काढण्यात येणार आहे.
या नियोजनबद्ध तयारीमुळे साताऱ्याचे हे साहित्य संमेलन केवळ चर्चेचेच नव्हे, तर पुस्तकांच्या विक्रीचेही नवे रेकॉर्ड प्रस्थापित करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
