फलटणच्या गजानन चौकात आज महायुतीचा ‘विजयाेत्सव’; मंत्री जयकुमार गोरेंच्या उपस्थितीत नवनियुक्त नगराध्यक्ष व नगरसेवकांचा गौरव

। लोकजागर । फलटण । दि. २५ डिसेंबर २०२५ ।

फलटण नगरपरिषद निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल मतदार बंधू-भगिनींचे आभार मानण्यासाठी आज, गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी भव्य ‘जाहीर आभार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात नवनिविर्वाचित नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपा-राष्ट्रवादी महायुतीच्या सर्व नवनियुक्त नगरसेवकांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ पार पडणार असून हा सोहळा फलटणमधील गजानन चौक येथे आज सायंकाळी ६.०० वाजता संपन्न होईल. याप्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि महायुतीचे अन्य प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

फलटणच्या राजकारणात प्रदीर्घ काळानंतर झालेल्या ‘राजे गटाच्या’ सत्ता परिवर्तनानंतर ही पहिलीच मोठी जाहीर सभा होत असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष याकडे लागले आहे. आजच्या सभेत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि मंत्री जयकुमार गोरे हे सत्ता परिवर्तनावर काय भाष्य करणार आणि विरोधकांचा कसा समाचार घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष आणि आभार मेळाव्यासाठी गजानन चौक सज्ज झाला असून, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love