फलटणचा कायापालट होणार? सत्तापरिवर्तनानंतर आता बारामतीच्या तोडीच्या विकासाकडे फलटणकरांच्या नजरा

। लोकजागर । फलटण । रोहित वाकडे । दि. २७ डिसेंबर २०२५ ।

फलटण नगरपालिकेची बहुप्रतिक्षित निवडणूक अखेर संपली असून, प्रस्थापित ‘राजे गटाला’ धक्का देत मतदारांनी भाजपा-राष्ट्रवादी महायुतीवर विश्वास दर्शवला आहे. बारामतीच्या तुलनेत फलटणचा विकास खुंटल्याची खदखद मतदानाद्वारे बाहेर आली असून, आता नवनियुक्त सत्ताधाऱ्यांसमोर शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे मोठे आव्हान आहे. प्रामुख्याने रस्ते आणि सार्वजनिक सुविधा किती वेगाने सुधारतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


सत्तांतराची महत्त्वाची कारणे: जनतेचा मूड आणि रणनीती

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्येच फलटणकरांनी बदलाचे संकेत दिले होते. राजे गटाने अनिकेतराजे यांना रिंगणात उतरवून आणि शेवटच्या क्षणी ‘शिवसेना’ प्रवेश करून वातावरण फिरवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो फसला. दुसरीकडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासकीय सुविधा, रस्ते, पाणी आणि क्रीडांगणासाठी आणलेला कोट्यवधींचा निधी मतदारांना अधिक प्रभावी वाटला.

प्रशासकीय राजवटीत झालेली शहराची दुरावस्था, खड्डेमय रस्ते आणि स्वच्छतेचा अभाव याचा मोठा फटका प्रस्थापितांना बसला. राजकीय सभांचा विचार करता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विकासावर आधारित भाषण मतदारांना अधिक भावले, तर विरोधकांची टीका आणि विनोदांवर आधारित भाषणे मतदारांना आकर्षित करू शकली नाहीत.

‘बारामती मॉडेल’चे स्वप्न आणि सत्ताधाऱ्यांची जबाबदारी

महायुतीला जरी पूर्ण २७-० यश मिळाले नसले, तरी १८ नगरसेवकांची मजबूत फौज मिळाली आहे. नवनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना नगरपालिका कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असल्याने, विस्कटलेली प्रशासकीय घडी ते लवकरच बसवतील अशी अपेक्षा आहे.

विकासाचा रोडमॅप

सत्ताधाऱ्यांनी आता शहराच्या विकासाचा ठोस रोडमॅप तयार केला असून, त्यात रस्ते दुरुस्तीला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आभार सभेत आश्वासन दिल्याप्रमाणे, येत्या सहा महिन्यांत संपूर्ण फलटण शहर खड्डेमुक्त करण्याचे मोठे लक्ष्य सत्ताधाऱ्यांसमोर असून, त्या दृष्टीने कामाचे नियोजन सुरू झाले आहे. या विकासकामांसाठी आवश्यक असणारा निधी खेचून आणण्याचे आव्हान आमदार सचिन पाटील आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर रहाणार आहे. केवळ आश्वासने न देता, निवडणुकीत दिलेला जाहीरनामा केवळ कागदावर न ठेवता तो प्रत्यक्षात उतरवणे, हे सत्ताधाऱ्यांच्या राजकारणाच्या दीर्घकालीन यशासाठी अत्यंत आवश्यक ठरणार आहे.

फलटणकरांनी विकासाच्या आशेने राजकीय बदल घडवून आणला आहे. आता बारामतीच्या तोडीचे शहर म्हणून फलटण उभे राहणार का? आणि विकासाचा हा वेग किती टिकणार? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल.

Spread the love