। लोकजागर । फलटण । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्याच्या राजकारणात एक मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे. प्रस्थापित राजे गट आणि नव्याने सत्तेत आलेला खासदार गट या दोन्ही सत्ताकेंद्रांना आव्हान देण्यासाठी तालुक्यात ‘फलटण विकास आघाडी’ या नावाखाली तिसरा पर्याय उभा करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राजकीय वर्तुळात या संभाव्य तिसऱ्या आघाडीची जोरदार चर्चा रंगू लागली असून, यामुळे आगामी निवडणुका तिरंगी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
राजकीय पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न
नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत राजे गटाला पराभवाचा धक्का बसला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी खासदार गटामध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने अनेकांना संधी मिळण्याची चिन्हे कमी आहेत. याच राजकीय स्थितीचा फायदा घेण्याच्या तयारीत ‘फलटण विकास आघाडी’ असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणनिहाय निवडून येण्याची क्षमता असलेल्या (Elective Merit) सक्षम उमेदवारांशी या आघाडीमार्फत गुप्तपणे संपर्क साधला जात असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.
नाराज गट आणि तरुणांना साद
ही आघाडी प्रामुख्याने तालुक्यातील लहान-मोठे स्थानिक गट, दोन्ही प्रमुख गटांतील नाराज कार्यकर्ते आणि प्रस्थापितांविरुद्ध शड्डू ठोकू इच्छिणाऱ्या तरुणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. “सर्वसामान्यांची आघाडी” अशी प्रतिमा तयार करून ही आघाडी जनतेसमोर जाण्याच्या तयारीत आहे. विशेषतः सोशल मीडिया आणि तरुण वर्गामध्ये या नव्या राजकीय पर्यायाबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे.
किंग मेकर ठरणार की स्वतंत्र अस्तित्व टिकवणार?
सध्या या आघाडीचे मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांचे उमेदवार कोण असणार, याबाबत कमालीची गुप्तता पाळली जात आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतरच ‘फलटण विकास आघाडी’ अधिकृतपणे आपले पत्ते उघड करेल, असे बोलले जात आहे. ही आघाडी पूर्ण ताकदीने स्वतंत्र लढून प्रस्थापितांचे गणित बिघडवणार की निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या मोठ्या गटाशी ‘तह’ करणार, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.
जर ही तिसरी आघाडी प्रभावीपणे मैदानात उतरली, तर तालुक्यातील निकालाचे अपेक्षित चित्र पूर्णपणे पालटू शकते, अशी भीती दोन्ही प्रमुख गटांना वाटू लागली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फलटणच्या राजकारणात ‘गट-तटाच्या’ पलीकडे जाऊन हा तिसरा पर्याय किती यशस्वी ठरतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
