प्रभाग आठमध्ये स्वच्छतेचा धडाका; नगरसेविका सिद्धाली शहा यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या सूचना

। लोकजागर । फलटण । दि. ३१ डिसेंबर २०२५ ।

फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नवनियुक्त नगरसेविकांनी आपल्या कामाचा धडाका सुरू केला आहे. प्रभाग क्रमांक ८ च्या नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा यांनी आज प्रभागातील विविध भागांचा दौरा करून स्वच्छतेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पालिकेत जावून स्वच्छता कर्मचाऱ्यांना कामाबाबत आवश्यक सूचना दिल्या.

निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी सिद्धाली शहा यांनी पहिल्या दिवसापासूनच सक्रिय सहभाग नोंदवला आहे. प्रभागातील अंतर्गत रस्ते, गटर आणि सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी त्यांनी कर्मचाऱ्यांना दैनंदिन स्वच्छतेचे नियोजन चोख ठेवण्याचे निर्देश दिले. “प्रभाग आठ हा स्वच्छ आणि सुंदर प्रभाग म्हणून ओळखला जावा, हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नगरसेविका स्वतः रस्त्यावर उतरून कामाची पाहणी करत असल्याने प्रभागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. प्रशासकीय कामात शिस्त आणण्यासोबतच जनतेच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Spread the love