साताऱ्यात रंगणार ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा; सर्वांसाठी खुला प्रवेश, आजपासून ४ दिवस साहित्याचा उत्सव

। लोकजागर । सातारा । दि. ०१ जानेवारी २०२६ ।

तब्बल ३२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सातारा नगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दि. १ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियमवर संपन्न होत आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे (शाहूपुरी शाखा) आणि मावळा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित या ‘शतकपूर्व’ संमेलनात सर्वांना खुला प्रवेश असून, सातारकर, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ज्ञानयज्ञात खुल्या मनाने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी केले आहे.

सह्याद्रीच्या हिरवाईचे गाणे आणि भव्य ग्रंथदिंडी

या संमेलनासाठी विशेष ‘संमेलन गीत’ तयार करण्यात आले असून, त्यातून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्या वैभवशाली परंपरेसोबतच सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या सामाजिक क्रांतीचे दर्शन घडणार आहे. संमेलनाची सुरुवात एका भव्य ग्रंथदिंडीने आणि शोभायात्रेने होणार आहे. यामध्ये ५५ शाळा-महाविद्यालयांचे चित्ररथ आणि जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा एक याप्रमाणे ११ चित्ररथांच्या माध्यमातून महाराष्ट्राची संत परंपरा आणि लोकसाहित्याचे दर्शन घडवले जाणार आहे.

‘अटकेपार’ स्मरणिका आणि ग्रंथदालनाचे वेगळेपण

मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या सातारच्या शौर्याची आठवण म्हणून संमेलनाच्या स्मरणिकेला ‘अटकेपार’ असे नाव देण्यात आले आहे. या स्मरणिकेत सातारा जिल्ह्याचा इतिहास, संस्कृती, पत्रकारिता आणि कृषीव्यवस्थेवर प्रज्ञावंतांनी लिहिलेले संग्राह्य लेख समाविष्ट आहेत. विशेष म्हणजे, यंदा ग्रंथदालनांचे नियोजन अशा पद्धतीने केले आहे की, प्रत्येक साहित्यप्रेमीला पुस्तकांच्या दालनातूनच मुख्य मंडपात प्रवेश करावा लागेल. यामुळे वाचक आणि प्रकाशक यांचा थेट समन्वय साधला जाणार असून, पुस्तक विक्रीला मोठी चालना मिळणार आहे.

नाटके, परिसंवाद आणि सांस्कृतिक मेजवानी

चार दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमात कवी कट्टा, गझल कट्टा, बहुरूपी भारूड आणि कथाकथन अशा विविध कलांचा आविष्कार होणार आहे. संमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे अभिनेते प्रशांत दामले यांचे ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक आणि ‘हास्यजत्रा’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. याशिवाय ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत, अमोल पालेकर यांच्या पुस्तकावर संवाद आणि विविध समकालीन विषयांवरील परिसंवाद साहित्याची गोडी वाढवणार आहेत. या अभूतपूर्व सोहळ्यासाठी जगभरातील साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.

Spread the love