। लोकजागर । फलटण । दि. १ जानेवारी २०२६ ।
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच फलटण तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गुणवरे जिल्हा परिषद गट ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटातून महायुतीतर्फे सौ. ऋतुजा अभिजीत जगताप यांनी आपली प्रबळ दावेदारी सादर केली आहे. महायुतीच्या नेतृत्वाने संधी दिली, तर गुणवरे गटातून पूर्ण ताकदीने निवडणूक लढवून विजय खेचून आणू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
सौ. ऋतुजा जगताप या गोखळी गावचे विद्यमान उपसरपंच आणि भाजपचे युवा नेते अभिजीत सुरेश जगताप यांच्या पत्नी आहेत. जगताप कुटुंबियाला गेल्या २०-२५ वर्षांचा समृद्ध सामाजिक आणि राजकीय वारसा लाभला आहे. अभिजीत जगताप हे फलटण पूर्व भागातील ज्येष्ठ नेते मनोज तात्या गावडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मनोज तात्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गोखळी गावाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. तसेच सौ. ऋतुजा यांचे सासरे सुरेश संभाजी जगताप हे देखील हनुमान विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत असून, सर्वसामान्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारे कुटुंब म्हणून जगताप परिवाराची परिसरात मोठी ओळख आहे.
गुणवरे गटातील जनसंपर्क आणि सामाजिक कार्याची दखल घेता, सौ. ऋतुजा जगताप यांच्या उमेदवारीसाठी गोखळीसह संपूर्ण परिसरातून नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. “तळागाळातील कार्यकर्त्याला आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या कुटुंबाला महायुतीने संधी द्यावी,” अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पक्ष कार्यकर्ते, विविध संघटना आणि जाणकारांच्या मते, जर सौ. जगताप यांना संधी मिळाली तर त्या या संधीचे नक्कीच सोनं करतील. त्यामुळे आता महायुतीचे वरिष्ठ नेतृत्व गुणवरे गटाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
