राजेंद्र गोफणे गुरुजींची बॅडमिंटन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; वयाच्या ५१ व्या वर्षी क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी

। लोकजागर । फलटण । दि. १ जानेवारी २०२६ ।

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (MSCERT) आयोजित शिक्षक, कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धेत फलटण तालुक्यातील धनगरवाडी (हिंगणगाव) येथील प्राथमिक शिक्षक श्री. राजेंद्र गोफणे यांनी बॅडमिंटनमध्ये राज्य पातळीवर धडक मारली आहे. कोल्हापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्यांची ही निवड झाली असून, त्यांच्या या यशाने फलटणच्या शैक्षणिक आणि क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.

राजेंद्र गोफणे सर हे गेल्या अनेक वर्षांपासून बॅडमिंटनमध्ये सक्रिय आहेत. सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षक व अधिकारी क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटन ‘डबल्स’ प्रकारात त्यांनी सलग तीन वर्षे विजेतेपद पटकावले आहे. केवळ खेळाडूच नव्हे, तर जिल्हास्तरीय बॅडमिंटन पंच म्हणूनही त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली असून, सध्या ते बारामती तालुका बॅडमिंटन असोसिएशनवर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. पुणे, अकलूज, बारामती आणि माळीनगर येथे झालेल्या विविध खुल्या स्पर्धांमध्येही त्यांनी आपल्या खेळाची छाप पाडली आहे.

साहसी उपक्रम आणि सामाजिक बांधिलकी

गोफणे सरांची ओळख केवळ एक खेळाडू म्हणून नाही, तर एक उपक्रमशील शिक्षक म्हणूनही आहे. महाबळेश्वर तालुक्यातील ‘दरे’ शाळेत कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘काठीवरील कसरत’ हा साहसी उपक्रम राबवला होता. या अनोख्या उपक्रमाची दखल सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) याशनी नागराजन मॅडम यांनी घेऊन सरांचे विशेष कौतुक केले होते. तसेच महाबळेश्वरमधील अतिवृष्टीच्या काळात त्यांनी मित्र परिवार आणि संस्थांच्या माध्यमातून पाच गावांना जीवनावश्यक वस्तूंची मदत मिळवून देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली होती.

Spread the love