। लोकजागर । काळज । दि. २ जानेवारी २०२६ ।
बडेखान ते साखरवाडी या अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक ग्रामस्थांनी मागील आठवड्यात आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रसारमाध्यमांनी या प्रश्नाला वाचा फोडल्यानंतर प्रशासकीय स्तरावर तातडीने हालचाली सुरू झाल्या असून, ग्रामस्थांच्या या मागणीला मोठे यश प्राप्त झाले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होत असून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या संदर्भात फलटणचे नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. आंबेकर आणि सौ. मसके मॅडम यांनी रस्त्याची पाहणी करून काम सुरू करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या सूचनांमुळे हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते वसीम इनामदार यांनी विशेष पाठपुरावा केला.
तातडीने खड्डेमुक्ती आणि फेब्रुवारीत ‘कार्पेट’
सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्याने या रस्त्यावरून ऊस वाहतूक करणाऱ्या जड वाहनांची मोठी वर्दळ आहे. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सौ. मसके मॅडम यांनी स्पष्ट केले की, सध्या रस्ता पूर्णपणे नवीन केल्यास जड वाहतुकीमुळे तो पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तूर्तास वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्यावरील खड्डे बुजवून साईड पट्ट्या भरून घेतल्या जातील. कारखान्याचा हंगाम संपल्यानंतर, फेब्रुवारी अखेरीस या संपूर्ण रस्त्यावर ‘कार्पेट’ (डांबरीकरण) करण्याचे काम हाती घेतले जाईल.
ग्रामस्थांकडून समाधान आणि आभार
बडेखान-साखरवाडी रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने खराडेवाडी, तडवळे, घाडगेमळा, नांदल, काळज, साखरवाडी, खामगाव आणि मुरूम या गावांतील ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. आता हा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सर्व गावांतील नागरिकांनी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, बांधकाम विभागाचे अधिकारी सौ. मसके मॅडम आणि लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले आहेत.
प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानुसार काम वेळेत पूर्ण होईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
