। लोकजागर । मुंबई । दि. 28 जानेवारी 2025 ।
“अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठा धक्का आहे. एका कर्तृत्ववान आणि निर्णयक्षमता असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दरम्यान, या अपघाताभोवती सुरू असलेल्या राजकीय चर्चांना पूर्णविराम देत, “यात कोणतेही राजकारण नाही, हा निव्वळ अपघात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्राचे न भरून येणारे नुकसान
अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार भावूक झाले होते. ते म्हणाले की, “जे काही नुकसान झाले आहे ते कधीही भरून निघणारे नाही. काही गोष्टी आपल्या हातात नसतात, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मोठी आहे.”
राजकीय चर्चांचे केले खंडन
गेल्या काही तासांपासून या अपघाताबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते. विशेषतः कलकत्त्यावरून काही माध्यमांनी या अपघातामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता वर्तवली होती. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले:
“मी आज मीडियासमोर येणार नव्हतो, पण काही माध्यमांमध्ये या अपघातामागे राजकारण असल्याचा सूर उमटत असल्याचे मला कळले. मला स्पष्ट करायचे आहे की, यात कोणतेही राजकारण नाही. हा केवळ एक दुर्दैवी अपघात आहे. या मृत्यूच्या यातना संपूर्ण महाराष्ट्राला आणि आम्हा सर्वांना आहेत.”
संयम बाळगण्याचे आवाहन
शरद पवार यांनी सर्वांना विनंती केली की, अशा दुःखाच्या प्रसंगी अफवा पसरवू नयेत किंवा या घटनेचे राजकारण करू नये. “कृपया ह्यात राजकारण आणू नये, एवढंच मला सांगायचं आहे,” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
