ऋतुजा अभिजीत जगताप आणि संजय पवार यांच्या प्रचारार्थ आसू येथे जाहीर सभा संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. ०५ फेब्रुवारी २०२६ ।
फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असून रस्ते, वीज, पाणी आणि आरोग्यासारख्या मूलभूत सुविधांना आम्ही प्राधान्य देत आहोत. मात्र, गेल्या ३० वर्षांपासून केवळ सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवणाऱ्या विरोधकांनी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या स्वाभिमानाशी खेळ केला आहे. एकाच रस्त्याचे दहावेळा नारळ फोडून विकासाचा आभास निर्माण करणाऱ्यांनी आता विकासाच्या गप्पा मारू नयेत, अशा कडक शब्दांत आमदार सचिन पाटील यांनी विरोधकांचा समाचार घेतला. आसू (ता. फलटण) येथे गुणवरे गटातील महायुतीच्या उमेदवार ऋतुजा अभिजीत जगताप आणि पंचायत समिती उमेदवार संजय पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.
सभेला संबोधित करताना आमदार पाटील यांनी तालुक्यात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. ते म्हणाले की, “रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तालुक्याची विकासाची घोडदौड सुरू ठेवली आहे. २६५ कोटी रुपयांचा फलटण-आसू रस्ता पूर्णत्वाकडे आहे आणि प्रत्येक वाडीवस्तीवर रस्ता नेल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचे आश्वासन आम्ही निम्म्याहून अधिक प्रमाणात पूर्ण केले असून उर्वरित कामही लवकरच मार्गी लागेल. तसेच कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर आणि साडेसात कोटींचे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे.” ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जाहीर केल्यानुसार, महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आल्यास तालुक्याला विकासासाठी २५० कोटींचा अतिरिक्त निधी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी आसू गावातील एकोपा आणि स्वर्गीय दादाराजे खर्डेकर यांच्या वारशाचा उल्लेख करत विरोधकांना टोला लगावला. “आसू गावातील पहिला सातबारा माझा आहे, त्यामुळे हीच माझी कर्मभूमी आहे हे विरोधकांनी विसरू नये,” असे ते म्हणाले. तसेच, दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन करताना त्यांनी मतदारांना ‘घड्याळ’ चिन्हापुढील बटन दाबून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला बजरंग गावडे, मनोज गावडे, अनिल जाधव यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
