महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्य उपसंपर्कपदी दिनेश लोंढे यांची निवड

। लोकजागर । फलटण । दि. ११ फेब्रुवारी २०२६ ।

महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत राज्य उपसंपर्क या महत्त्वाच्या पदावर पत्रकार दिनेश लोंढे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड संघटनेचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव शेखर सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली.
दिनेश लोंढे हे गेल्या पाच वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी विविध सामाजिक, प्रशासकीय तसेच जनहिताशी संबंधित विषयांवर सातत्याने वृत्तांकन व लेखन केले आहे. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत जनतेच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे.

पत्रकारितेबरोबरच दिनेश लोंढे हे समाजकार्यामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येते. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी पुढाकार घेतला असून गरजूंसाठी मदतकार्य, लोकजागृती तसेच सामाजिक प्रश्नांवर जनमत निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले आहेत.

संघटनात्मक कामाचा अनुभव असलेल्या लोंढे यांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी चार वेळा यशस्वीपणे सांभाळली आहे. जिल्हा पातळीवर पत्रकारांचे प्रश्न, व्यावसायिक अडचणी, तसेच पत्रकार हिताच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला.

राज्य उपसंपर्कपदाच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांतील पत्रकार संघटनांशी समन्वय, संघटनेच्या विस्तारासाठी कार्य, तसेच पत्रकारांच्या समस्या व मागण्यांबाबत संघटनेच्या वतीने प्रभावीपणे भूमिका मांडण्याची जबाबदारी दिनेश लोंढे यांच्यावर असणार आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया देताना दिनेश लोंढे म्हणाले, “महाराष्ट्र पत्रकार संघाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी संघटनेचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, सचिव शेखर सुर्यवंशी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. पत्रकार बांधवांचे प्रश्न, त्यांच्या सुरक्षिततेचा विषय आणि संघटनेचे कार्य अधिक सक्षमपणे पुढे नेण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. संघटनेच्या माध्यमातून पत्रकार हितासाठी सातत्याने प्रयत्न करणे हेच माझे ध्येय राहील.”

दिनेश लोंढे यांच्या या निवडीबद्दल सातारा जिल्ह्यासह राज्यातील पत्रकार बांधव, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Spread the love