रणजितदादांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासकीय कामांना मिळणार ‘सुपरफास्ट’ गती; फलटणमध्येच मार्गी लागणार जिल्हास्तरीय प्रश्न

। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२६ ।

फलटणच्या प्रशासकीय वैभवात आज मानाचा तुरा खोवला गेला असून राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत फलटण येथे ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय’ आणि साखरवाडी येथे ‘अप्पर तहसीलदार कार्यालय’ स्थापन करण्यास अधिकृत मंजुरी देण्यात आली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि फलटण-कोरेगाव विधानसभेचे आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे, फलटणसोबतच माढा मतदारसंघातील पंढरपूर येथेही अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आले असून, यामुळे या संपूर्ण परिसरातील प्रशासकीय कामांना मोठी गती मिळणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे नागरिकांना आता जिल्हा स्तरावरील कामांसाठी सातारा शहराकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही, तर ही सर्व कामे आता स्थानिक पातळीवरच मार्गी लागणार आहेत.

या निर्णयाकडे फलटणकरांच्या स्वतंत्र जिल्ह्याच्या स्वप्नपूर्तीचे पहिले पाऊल म्हणून पाहिले जात आहे. या संदर्भात बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, फलटणला स्वतंत्र जिल्हा करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असून आज मंजूर झालेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय ही त्या दिशेने झालेली महत्त्वपूर्ण सुरुवात आहे. जिल्हास्तरीय सर्व महत्त्वाची कार्यालये टप्प्याटप्प्याने फलटण येथे आणण्याचा आमचा मानस असून येणाऱ्या काळात ‘टाऊन प्लॅनिंग ऑफिस’ सुद्धा येथे आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने हे लक्ष्यही लवकरच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखरवाडीसारख्या ग्रामीण भागात अप्पर तहसीलदार कार्यालय कार्यान्वित झाल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांच्या महसूल विषयक कामांचा निपटारा जलद गतीने होणार आहे.

विकासाला गती देणाऱ्या या निर्णयाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रशासकीय विकेंद्रीकरणाचा हा निर्णय सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.

Spread the love