राज्य कर निरीक्षक पदावरही मारली बाजी; भावासोबत बहिणीचेही स्पर्धा परीक्षेत यश
। लोकजागर । फलटण । दि. ६ मार्च २०२६ ।
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक (PSI) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये फलटण तालुक्यातील गिरवी गावच्या विशाल नारायण वाघ याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, विशालची राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठीही राज्यातून २८ व्या क्रमांकाने निवड झाली असून, एकाच वेळी दोन मोठ्या पदांना गवसणी घातल्याने तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे.
विशाल वाघ याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने २०२१ मध्ये कृषी महाविद्यालय, कोल्हापूर येथून पदवी संपादन केली. गेल्या ४-५ वर्षांपासून तो जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. विशालच्या या यशात त्याच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. त्याची बहीण तनश्री हिने देखील राज्यसेवा परीक्षेत ‘निरीक्षण अधिकारी’ (पुरवठा) पदावर यश मिळवून कुटुंबाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. आई-वडिलांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून या दोन्ही भावंडांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे.
आपल्या यशाबद्दल बोलताना विशाल म्हणाला की, “माझ्या आई-वडिलांनी काबाडकष्ट करून आम्हाला शिकवले, आज त्यांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले आहे. हे यश मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो.” शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी त्याने फलटण येथील ‘योद्धा करिअर अकॅडमी’चे संस्थापक रणजीत तांबे यांचे मार्गदर्शन घेतले. तांबे सरांच्या अचूक मार्गदर्शनामुळेच पोलीस उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक असलेल्या शारीरिक निकषांमध्ये उत्तम गुण मिळवता आल्याचे त्याने आवर्जून नमूद केले.
विशालची सध्या राज्य कर निरीक्षक (STI) पदासाठी निवड झाली असून, त्याचे प्रशिक्षण मुंबईतील माझगाव येथे पूर्ण झाले आहे. येत्या २०-२५ दिवसांत तो या पदावर रुजू होणार आहे. पीएसआय पदाचे प्रशिक्षण सुरू होण्यास अजून सहा ते सात महिन्यांचा कालावधी असल्याने, तोपर्यंत तो एसटीआय म्हणून सेवा बजावेल आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक म्हणून खाकी वर्दीत जनसेवेसाठी रुजू होईल. गिरवी सारख्या ग्रामीण भागातील तरुणाने राज्यातून पहिला येण्याचा बहुमान मिळवल्याने संपूर्ण जिल्ह्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
