महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन
। लोकजागर । फलटण । दि. ६ मार्च २०२६ ।
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा फलटण यांच्या वतीने फलटण तालुक्यातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी एका विशेष ’काव्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील सुप्त गुण असलेल्या तरुण कवयित्रींना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील काव्यप्रतिभेला वाव मिळावा, या उदात्त हेतूने हे काव्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवतींच्या शब्दांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न साहित्य परिषद करणार आहे.
या संमेलनात सहभागी होऊ इच्छिणार्या विद्यार्थिनींनी आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी शाखा कोषाध्यक्ष सौ. अलका बेडकीहाळ (8380035321) किंवा शाखा कार्यवाह अमर शेंडे (9922778386), रोहित वाकडे (9850444163) यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. नोंदणी करण्याची अंतिम मुदत 10 मार्च 2026 पर्यंत असून, तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, सहभागी विद्यार्थिनींमधून ज्या कवयित्री उत्तम काव्य सादरीकरण करतील, त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मुख्य व्यासपीठावर आणि पुढील साहित्यिक उपक्रमांमध्ये आपली काव्यरचना सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
दर्जेदार काव्य करणार्या तरुणींना योग्य दिशा व व्यासपीठ मिळवून देण्यासाठी परिषद कटिबद्ध असल्याचे शाखा अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी स्पष्ट केले आहे. फलटण तालुक्यातील महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थिनींना या साहित्यिक चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही यावेळी बेडकीहाळ यांनी केले आहे.
