फलटण बाजार समितीत हरभरा व तूर हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ

हरभऱ्याला ५,८७५ तर तुरीला ८,००० रुपये दर; नोंदणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

। लोकजागर । फलटण । दि. ६ मार्च २०२६ ।

शेतमालाचे बाजारभाव कोसळल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात ‘नाफेड’ व ‘तालुका खरेदी विक्री संघामार्फत’ हरभरा आणि तूर हमीभाव खरेदी केंद्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे. या केंद्रावर शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार हरभऱ्यासाठी प्रति क्विंटल ५,८७५ रुपये आणि तुरीसाठी ८,००० रुपये इतका दर निश्चित करण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

हंगाम २०२५-२६ अंतर्गत या दोन्ही पिकांच्या खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. तूर खरेदीसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत २४ मार्च २०२६ असून, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही, त्यांनी त्वरित आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन समितीचे व्हाईस चेअरमन भगवानराव होळकर यांनी केले आहे.

नोंदणीसाठी आवश्यक अटी व कागदपत्रे: या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर चालू हंगामातील संबंधित पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी आधार कार्डची छायांकित प्रत, डिजिटल स्वाक्षरी असलेला ७/१२ उतारा, ८-अ खाते उतारा आणि बँक पासबुकची प्रत ही कागदपत्रे घेऊन फलटण मार्केट यार्डमधील मुख्य कार्यालयात संपर्क साधायचा आहे. शेतमालाची गुणवत्ता राखण्यासाठी मालामध्ये कमाल आर्द्रता (ओलावा) १२ टक्क्यांपर्यंत असणे आवश्यक आहे.

एसएमएसद्वारे मिळणार तारीख: ऑनलाइन नोंदणी पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माल विक्रीसाठी आणण्याची तारीख कळवली जाईल. केवळ दिलेल्या तारखेलाच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्रावर आणावा, असे समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी स्पष्ट केले आहे.

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक विठ्ठल जाधव (मो. ७९७२४१७५४६) किंवा बाजार समितीचे ग्रेडर के. पी. सस्ते (मो. ९८९०४५६८२४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love