सातारा जिल्ह्यात ५,५०० प्रगणकांकडून डिजिटल नोंदणी; १६ मेपासून पहिल्या टप्प्याला सुरुवात
। लोकजागर । सातारा । दि. ६ मार्च २०२६ ।
देशाच्या धोरणनिर्मितीसाठी आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ‘जनगणना २०२७’ दोन टप्प्यांत राबवली जाणार आहे. या प्रक्रियेतील पहिला टप्पा १६ मे ते १५ जून २०२७ या कालावधीत पार पडणार असून, यामध्ये प्रत्यक्ष घरगणना केली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी नागेश पाटील यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात प्रगणक त्यांना नेमून दिलेल्या क्षेत्रात घरोघरी भेट देऊन माहिती संकलित करतील. यावेळी कुटुंबातील प्रमुखाला शासनाने निश्चित केलेले ३४ प्रश्न विचारले जाणार असून, ती माहिती तात्काळ जनगणना पोर्टलवर अपलोड केली जाईल. विशेष म्हणजे, नागरिकांना स्वतःची व कुटुंबाची माहिती भरण्यासाठी १ मे ते १५ मे या कालावधीत census.gov.in/se या संकेतस्थळावर ‘सेल्फ इन्युमरेशन’ची (स्वतः माहिती भरण्याची) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यात प्रत्यक्ष लोकसंख्या मोजणी जनगणनेचा दुसरा टप्पा १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०२८ या दरम्यान राबवला जाणार आहे. या कालावधीत प्रत्यक्ष लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती संकलित केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेचा मुख्य उद्देश देशातील लोकसंख्येची सामाजिक, आर्थिक आणि लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये जाणून घेणे हा आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र व राज्य सरकारांना आगामी काळातील विकास योजना, संसाधनांचे वाटप आणि पायाभूत सुविधांचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.
सातारा जिल्ह्यात डिजिटल जनगणनेची जय्यत तयारी आगामी जनगणना ही पूर्णतः डिजिटल स्वरूपात होणार असून, माहिती संकलन जलद आणि पारदर्शक व्हावे यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. सातारा जिल्ह्यात या मोहिमेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील हे प्रधान जनगणना अधिकारी म्हणून काम पाहत असून, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी सुमारे ५,५०० प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामीण भागासाठी तहसीलदार, तर शहरी भागासाठी मुख्याधिकारी हे ‘चार्ज अधिकारी’ म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
प्रशासनाकडून या भव्य उपक्रमासाठी जय्यत तयारी पूर्ण झाली असून, नागरिकांनी प्रगणकांना अचूक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
