फलटणमध्ये ८ विरुद्ध ८ : सभापतीपदाचा पेच सुटणार कसा?
। लोकजागर । फलटण । दि. ६ मार्च २०२६ ।
सातारा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सत्तेच्या चाब्या कोणाच्या हाती जाणार, याचा फैसला आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक दि. २० मार्च २०२६ रोजी, तर जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक दि. १६ मार्च २०२६ रोजी होणार असल्याचे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने या निवडणुकांच्या नोटिसा बजावण्याचे काम सुरू केले असून राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
जिल्हा महसूल उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दि. २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद सभागृहात पार पडेल.
१६ मार्चला पंचायत समित्यांचा फैसला जिल्ह्यातील सर्व ११ पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती निवडीसाठी दि. १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संबंधित तालुका पंचायत समिती सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आल्या आहेत. या सभांच्या अध्यक्षतेसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या पिठासन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भातील अधिकृत नोटिसा ६ मार्च रोजी तहसीलदारांमार्फत बजावण्यात आल्या आहेत.
फलटणमध्ये ८ विरुद्ध ८ : सभापतीपदाचा पेच सुटणार कसा? या संपूर्ण प्रक्रियेत जिल्ह्याचे लक्ष फलटण पंचायत समितीच्या निवडीकडे लागले आहे. फलटण पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी ८ जागा खासदार गटाकडे तर ८ जागा राजे गटाकडे आहेत. दोन्ही गटांकडे समसमान संख्याबळ असल्याने सभापतीपदाचा पेच कसा सुटणार, याची मोठी उत्सुकता लागली आहे.
या ठिकाणी समसमान मतांमुळे चिठ्ठी टाकून निवड होणार की एखादा गट ‘मॅजिक फिगर’ गाठण्यासाठी वेगळी रणनीती आखणार, याकडे सर्वांच्या नजरा आहेत. फलटणच्या या राजकीय पेचामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
