। लोकजागर । फलटण । शनिवार, दि. ७ मार्च २०२६ ।
फलटण येथील पृथ्वी चौक (पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौक) ते दहिवडी रोडदरम्यान कोळकी येथे सुरू असलेल्या पुलाच्या कामाची पाहणी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर (भैय्या) आणि भाजपा सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी केली. या पुलाच्या उंचीबाबत स्थानिक ग्रामस्थांमध्ये असलेली चिंता आणि तांत्रिक बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे आणि ग्रामस्थांनी संबंधित कंपनीचे अधिकारी त्यागी यांची भेट घेऊन कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान बुवासाहेब नगर येथील ओढ्यात पुलाची उंची वाढवण्याबाबत चर्चा झाली. मात्र, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, पुलाचे डिझाईन अशा प्रकारे तयार केले आहे की, अतिवृष्टी झाली तरी ओढ्यातील पाणी व्यवस्थित वाहून जाईल. पुलाच्या दोन्ही बाजूंना संरक्षक भिंती (वॉल) बांधून पाण्याचा निचरा सुरळीत होईल, याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
आरटीओ कार्यालयासमोर आणि बुवासाहेब मंदिराजवळील पुलाच्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जाणार आहेत. “भविष्यात कितीही पाऊस झाला, तरी पुलावरून पाणी वाहणार नाही,” अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. तसेच, सध्या आरटीओ कार्यालयासमोर वाहतुकीसाठी असलेल्या तात्पुरत्या पुलाजवळील मोठा खड्डा तातडीने बुजवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्य पुलावरून वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
या पाहणीच्या वेळी संदीप नेवसे, रणजित जाधव, राजेंद्र खिलारे, किरण जाधव, किरण पखाले, गोरख जाधव, बाळासाहेब रिटे, रणजीत काशीद, वैभव गंगतिरे, सौरभ जाधव यांसह परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुलाचे व रस्त्याचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून ते लवकरच वाहतुकीसाठी खुले केले जाईल, असा शब्द कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिला आहे.
