अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे उद्या फलटणमध्ये आगमन; जय्यत तयारी पूर्ण

। लोकजागर । फलटण । रविवार, दि. ८ मार्च २०२६ ।

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोटच्या वतीने आयोजित ‘पालखी पादुका परिक्रमा’ सोहळ्याचे उद्या, सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी फलटण नगरीत मोठ्या उत्साहात आगमन होत आहे. या परिक्रमेचे हे ३९ वे वर्ष असून, स्वामी भक्तांमध्ये दर्शनासाठी प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली.

मिरवणूक आणि मार्ग:
मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सायंकाळी ५:०० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथे पालखीचे आगमन होईल. याठिकाणी पालखीचे स्वागत करून भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक श्री स्वामी समर्थ मंदिर (मलठण) येथून निघून श्री हरिवुवा मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट आणि श्रीराम मंदिर या मार्गावरून मार्गस्थ होईल.

मुक्कामाचे ठिकाण:
मिरवणुकीचा समारोप अहिल्यानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात होणार आहे. पालखीचा रात्रीचा मुक्काम श्री स्वामी समर्थ मंदिर, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण येथे असणार आहे. या काळात भाविकांना पादुका दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी या सोहळ्याला उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Spread the love