। लोकजागर । फलटण । दि. ११ मार्च २०२६ ।
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत विस्तारलेल्या आणि सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक पुन्हा एकदा बिनविरोध झाली आहे. विद्यमान चेअरमन दिलीपसिंह भोसले यांच्या कुशल आणि पारदर्शक नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत सभासदांनी सलग चौथ्यांदा ही निवडणूक बिनविरोध करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सुमारे ८०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या या संस्थेला दिलीपसिंह भोसले आणि व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी आपल्या प्रगल्भ नेतृत्वाने प्रगतीपथावर नेले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप यांनी दिली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी कांबळे, नायब तहसीलदार अनिल जाधव आणि सहाय्यक निबंधक राहुल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अधिकृतपणे नूतन संचालकांच्या नावांची घोषणा केली. काटकसर, पारदर्शक कारभार आणि सुमारे ५ हजार सभासद व ठेवीदारांचे हित जोपासल्यामुळेच ही संस्था आज दोन्ही राज्यांत विश्वासार्ह मानली जाते. सलग चारवेळा निवडणूक बिनविरोध होणे, हा भोसले यांच्या कार्याचा आणि सभासदांच्या त्यांच्यावरील अढळ विश्वासाचा मोठा विजय मानला जात आहे.
सन २०२६-२७ ते २०३१-३२ या आगामी सहा वर्षांच्या कालावधीसाठी निवडून आलेल्या नूतन संचालक मंडळात दिलीपसिंह भोसले, रणजितसिंह भोसले, अॅड. सौ. मधुबाला भोसले, सौ. प्रियदर्शनी भोसले, तुषार गांधी, हेमंत फुले, अमोल सस्ते, कुमार भट्टड, विलास रसाळ, दिपराज तावरे आणि सुभाष आढाव यांचा समावेश आहे. या बिनविरोध निवडीनंतर फलटण परिसरातील राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन केले असून संस्थेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
