। लोकजागर । सातारा/रहिमतपूर । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।
सातारा येथे येत्या मे महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनासाठी रहिमतपूर परिसरातील सजग नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करावे, असे आवाहन विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. भारत पाटणकर यांनी केले आहे. श्री संत गाडगे महाराज मिशन संचलित ब्रह्मपुरी आश्रम शाळेत पार पडलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गाडगे महाराज मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते होते. यावेळी संमेलन संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष विजय मांडके, सरचिटणीस ॲड. राजेंद्र गलांडे, वारकरी संप्रदायाचे राजेंद्र शेलार आणि प्रा. डॉ. विजय माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
वैचारिक वारशाची आठवण: डॉ. भारत पाटणकर यांनी आपल्या भाषणात या भूमीच्या ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे सहकारी जिजाबा मोहिते आणि गाडगे बाबा यांचे असलेले ऋणानुबंध आजही प्रेरणादायी आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांचे १२५ वे जयंती वर्ष आणि गाडगे बाबांचे २०० वे जयंती वर्ष असल्यामुळे या संमेलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
वारकरी संप्रदाय विद्रोही विचारांसोबत: संयोजन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. डॉ. सुहास महाराज फडतरे यांनी स्पष्ट केले की, वारकरी संतांचे विचार हे मुळातच विद्रोही आणि समतेचे आहेत, त्यामुळे वारकरी संप्रदाय या संमेलनाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. कार्याध्यक्ष विजय मांडके यांनी संमेलन आयोजनामागची भूमिका विशद केली, तर मधुसूदन मोहिते यांनी संमेलनासाठी येणाऱ्या साहित्यिक आणि कष्टकरी बांधवांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी राजेंद्र शेलार, ॲड. राजेंद्र गलांडे आणि प्रा. डॉ. विजय माने यांनीही आपले विचार मांडले. सुनील माने, चंद्रहास माने, मोहसीन शेख यांच्यासह परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
