ऐतिहासिक घोडायात्रेच्या नियोजनासाठीही नगरपरिषदेत महत्त्वपूर्ण बैठक; भाविकांच्या सोयीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश
। लोकजागर । फलटण । मंगळवार, दि. १० मार्च २०२६ ।
आगामी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आणि फलटणची ऐतिहासिक घोडायात्रा या पार्श्वभूमीवर आज फलटण नगरपरिषदेत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन अत्यंत महत्त्वाच्या बैठका संपन्न झाल्या. या बैठकांमध्ये शहरांतर्गत पालखी महामार्गाची कामे आणि यात्रेच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
पालखी मार्गासाठी विशेष आराखडा: पहिली बैठक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अधिकाऱ्यांसोबत झाली. यावेळी नगराध्यक्षांनी फलटण शहरातील अंतर्गत पालखी महामार्गाचे प्रलंबित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सक्त ताकीद दिली. “पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांची आणि स्थानिक नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये. महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी सुयोग्य करावा,” असे निर्देश त्यांनी दिले. या कामासाठी आवश्यक असणारा आराखडा आणि निधीबाबतही चर्चा करण्यात आली.

घोडायात्रेसाठी प्रशासकीय सज्जता: त्यानंतर शहरातील ऐतिहासिक घोडायात्रेसंदर्भात दुसरी महत्त्वाची बैठक पार पडली. यात्रेसाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि यात्रा सुरक्षित व सुव्यवस्थित पार पडावी, यासाठी नगराध्यक्षांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश दिले. “स्वच्छता, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था आणि सुरक्षा या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे. नगरपरिषदेच्या वतीने यात्रेसाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल,” असे आश्वासन त्यांनी दिले.
