फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त; विद्यमान सरपंचांकडेच सोपविली प्रशासकाची धुरा

उपसरपंच आणि सदस्यांची ‘प्रशासकीय समिती’ घेणार गावगाड्याचे निर्णय

। लोकजागर । फलटण। गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या कारभाराबाबत जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी फलटण तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकृत आदेश १० मार्च २०२६ रोजी निर्गमित केले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका घेणे शक्य नसल्याने, गावाचा विकास खुंटू नये यासाठी विद्यमान सरपंचांचीच ‘प्रशासक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

कायद्याचा आधार आणि नियुक्तीचे स्वरूप: महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील कलम १५१ मधील तरतुदींनुसार राज्य शासनाने प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला आहे. फलटण तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत फेब्रुवारी २०२६ मध्ये संपली आहे, अशा सर्व ६८ ग्रामपंचायतींवर पुढील सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा नवीन निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही व्यवस्था लागू राहणार आहे.

या गावांचा आहे समावेश:

या निर्णयांतर्गत फलटण तालुक्यातील खालील ६८ गावांच्या गावगाड्याची जबाबदारी आता प्रशासकीय समितीवर असेल:

साखरवाडी (पिंपळवाडी), तांबवे, कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, भिलकटी, जाधववाडी (फ.), अलगुडेवाडी, सोनवडी खु., तिरकवाडी, सस्तेवाडी, कापडगाव, निरगुडी, रावडी बु., वाघोशी, जिंती, कापशी, काशिदवाडी, फरांदवाडी, कुरवली बु., शिंदेनगर, ठाकूरकी, नांदल, सरडे, सांगवी, राजुरी, जावली, खामगाव, हिंगणगाव, मुंजवडी, साठे, खराडेवाडी, मलवडी, तडवळे, विंचुर्णी, वडगाव, निंबळक, मिरढे, कोरेगाव, मुरुम, भाडळी बु., भाडळी खु., टाकळवाडे, ढवळ, आंदरुड, रावडी खु., आरडगाव, शिंदेवाडी, नाईकबोमवाडी, कांबळेश्वर, निंभोरे, काळज, बिबी, हणमंतवाडी, बोडकेवाडी, होळ, सोनगाव, वडजल, फडतरवाडी, आळजापूर, राजाळे, गुणवरे, सोनवडी बु., ढवळेवाडी निं., झिरपवाडी, पवारवाडी, शेरेचीवाडी (हिं.) आणि जाधववाडी (ता.).

लोकशाहीचा मान; उपसरपंच आणि सदस्यांचा समितीत समावेश: गावाचा कारभार केवळ प्रशासकाच्या हाती न देता, तो अधिक लोकाभिमुख ठेवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक ‘प्रशासकीय समिती’ स्थापन केली आहे. या समितीमध्ये संबंधित ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच आणि सर्व निवडणून आलेल्या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रशासकांनी या समितीच्या सल्ल्याने आणि मान्यतेनेच ग्रामपंचायतीचे दैन्यंदिन कामकाज, विकासकामे आणि इतर कायदेशीर प्रक्रिया पार पाडणे बंधनकारक असणार आहे.

अंमलबजावणीचे आदेश: संबंधित गावांच्या विद्यमान सरपंचांनी प्रशासक म्हणून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच गट विकास अधिकारी, पंचायत समिती फलटण यांना या संपूर्ण प्रक्रियेची खातरजमा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात प्रशासकीय पोकळी निर्माण होणार नाही, याची खात्री पटली आहे.

.

Spread the love