। लोकजागर । फलटण/जिंती । शनिवार, दि. १४ मार्च २०२६ ।
रयत शिक्षण संस्थेच्या श्री जितोबा विद्यालय, जिंती (ता. फलटण) येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र जिंती यांच्या संयुक्त विद्यमाने मुखाचा कर्करोग व एचपीव्ही (HPV) लसीकरण संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समुपदेशक व ज्येष्ठ शिक्षक ताराचंद्र आवळे होते, तर जिंती आरोग्य उपकेंद्राचे डॉ. गायके एम. डी., आरोग्य सेवक भुजबळ ए. ए., साळुंखे ए. एस. आणि सौ. जमदाडे व्ही. एस. यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत पीपीटी (PPT) सादरीकरणाच्या माध्यमातून विद्यार्थिनी व पालकांना आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यशाळेत डॉ. गायके एम. डी. आणि आरोग्य सेविका भुजबळ ए. ए. यांनी मुखाचा कर्करोग व एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व विशद केले. सध्याच्या आरोग्य विभागाच्या धोरणानुसार, वय वर्षे १४ पूर्ण ते १५ वा वाढदिवस या दरम्यानच्या विद्यार्थिनींना ही लस दिली जाणार आहे. पौगंडावस्थेत होणारे शारीरिक व मानसिक बदल लक्षात घेता ही लस भविष्यातील गंभीर आरोग्य समस्या टाळण्यासाठी वरदान ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच लस घेतल्यानंतर कोणताही त्रास होत नसल्याने पालकांनी आणि विद्यार्थिनींनी कोणत्याही अफवांना किंवा चुकीच्या माहितीला बळी पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र आवळे यांनी महाराष्ट्र शासनाचा हा उपक्रम अत्यंत महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगून, उत्तम आरोग्य राखण्यासाठी मुलींनी यात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. वातावरणातील बदलांवर आपले नियंत्रण नसले तरी आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ घेणे आपल्या हातात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षक सोळंकी ए. आर. यांनी केले, तर आभार सौ. जमदाडे व्ही. एस. यांनी मानले. यावेळी आरोग्य विभाग प्रमुख कु. हन्नोरे एस. एम., सौ. सोनवलकर ए. ए. यांच्यासह महिला पालक आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
