फलटणच्या प्रत्येक प्रभागात मिळणार दर्जेदार आरोग्य सुविधा; माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ग्वाही

सोमवार पेठेत ‘नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र’ कार्यान्वित

। लोकजागर । फलटण । रविवार, दि. १५ मार्च २०२६ ।

“फलटण शहरातील प्रत्येक प्रभागात सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हे आमचे प्रमुख ध्येय आहे. याच उद्देशाने आरोग्यवर्धिनी केंद्रांची साखळी उभारली जात असून, महिलांच्या आरोग्यासाठी प्रभागनिहाय विशेष तपासणी शिबिरे आयोजित करावीत,” असे प्रतिपादन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण नगरपरिषदेच्या सोमवार पेठ येथे नूतन उभारण्यात आलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले, मुख्याधिकारी निखील जाधव, बांधकाम समिती सभापती सोमाशेठ जाधव, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ नेते मिलिंद नेवसे, भीमदेव बुरुंगले यांच्यासह विविध विषय समित्यांचे सभापती, नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

आरोग्यसेवेसोबतच वाचनालय आणि प्रकाश व्यवस्था: रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुढे सांगितले की, महिलांमध्ये आढळणारे विविध आजार, कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब आणि डोळ्यांची तपासणी अशा सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. या सोमवार पेठ केंद्राच्या वरच्या मजल्यावर सुसज्ज वाचनालय सुरू करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, शहरातील अंतर्गत रस्ते उजळण्यासाठी लवकरच ५० नवीन ‘स्ट्रीट लॅम्प’ बसवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

सामान्यांचे आर्थिक ओझे हलके झाले – नगराध्यक्ष समशेरसिंह: नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, यापूर्वी सोमवार पेठ परिसरातील नागरिकांना साध्या तपासणीसाठी शहरात जावे लागत होते. ओपीडी, औषधे आणि प्रवास मिळून साधारण ५०० रुपये खर्च होत होता. आता या आरोग्यवर्धिनी केंद्रामुळे नागरिकांना मोफत तपासणी व उपचार मिळणार आहेत. या केंद्रात रक्त तपासणी, लघवी तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी तसेच कॅन्सर तपासणीसारख्या विविध चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपनगराध्यक्ष प्रियदर्शिनी भोसले यांनीही अनेक वर्षांचा जागेचा प्रश्न सुटल्याबद्दल समाधान व्यक्त करून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

शहरात चार केंद्रे होणार कार्यान्वित: प्रास्ताविकात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कोंडके यांनी सांगितले की, शहरात एकूण चार आरोग्यवर्धिनी केंद्रे नियोजित असून दत्तनगर येथील जुन्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या जागेत तिसरे केंद्र लवकरच सुरू होईल. या केंद्रांमुळे उपजिल्हा रुग्णालयावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका घार्गे यांनी केले.

Spread the love