फलटणची शेती आता होणार ‘स्मार्ट’; तालुक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा क्रांतीकारी प्रयोग!

जिल्ह्यातील १२ गावांपैकी फलटणच्या ४ गावांची निवड; ‘रिअल-टाइम’ माहितीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात होणार मोठी वाढ

। लोकजागर । फलटण । रविवार, दि. १५ मार्च २०२६ ।

सातारा जिल्ह्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत शेती क्षेत्रात एक क्रांतिकारी पाऊल उचलले असून, यात फलटण तालुक्याला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समिती आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या ‘नाविण्यपूर्ण आधुनिक फळबाग विकास प्रकल्पा’अंतर्गत फलटण तालुक्यातील फळबागा आता कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युनिट्सने सज्ज होणार आहेत.

फलटण तालुक्यातील ‘या’ गावांची निवड: जिल्ह्यातील ५ तालुक्यांतील एकूण १२ गावांमध्ये हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. विशेष म्हणजे, या १२ गावांपैकी सर्वाधिक ४ गावे एकट्या फलटण तालुक्यातील असून यात धुमाळवाडी, गिरवी, बोडकेवाडी आणि निरगुडी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये प्रामुख्याने सलग फळबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा फलटणच्या बागायतदारांना होणार आहे.

काय आहे हे ‘AI’ तंत्रज्ञान? या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आता आपल्या फळपिकांची स्थिती, हवामानातील अचूक बदल, मातीतील ओलावा तसेच कीड व रोगांचे व्यवस्थापन यांबाबत ‘रिअल-टाइम’ (तात्काळ) माहिती मोबाइलवर मिळणार आहे. या आधुनिक यंत्रणेमुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादन वाढणार आहे, शिवाय औषधे आणि खतांच्या अनावश्यक खर्चात मोठी बचत होऊन उत्पादनाचा दर्जा जागतिक दर्जाचा (Export Quality) होण्यास मदत होणार आहे.

प्रशासकीय संकल्पना आणि प्रशिक्षण: जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांच्या नियोजनाखाली हा प्रकल्प फलटणसह जिल्ह्यात ७२५ हेक्टरवर राबवला जात आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या फलटणच्या शेतकऱ्यांना केवळ तंत्रज्ञानच नव्हे, तर फळपीक उत्पादन वाढ, कीड-रोग नियंत्रण आणि ‘स्मार्ट शेती’बाबत विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच कीड व्यवस्थापनासाठी आवश्यक ‘ट्रॅप्स-ल्युर्स’ व इतर तांत्रिक सहाय्य देखील कृषी विभागामार्फत पुरवले जाणार आहे.

फलटणचा शेतकरी नेहमीच नवनवीन प्रयोगांसाठी आघाडीवर असतो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे फलटणची शेती ‘डिजिटल’ युगात प्रवेश करत असून, यामुळे तालुक्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला नवी झळाळी मिळणार आहे.

फळपिकांच्या उत्पादकतेत होणार वाढ : भाग्यश्री फरांदे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. “AI आधारित यंत्रणेमुळे पिकांचे सतत निरीक्षण करणे आणि अचूक निर्णय घेणे शक्य होईल. विशेषतः उच्च मूल्य असलेल्या फळपिकांच्या उत्पादकतेत वाढ करण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल,” असे त्यांनी नमूद केले.

Spread the love