फलटण नगर परिषदेत नामकरणावरून वाद पेटणार; जुनी नावे बदलण्यास विरोध; नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे साकडे

। लोकजागर । फलटण । दि. मार्च २०२६ ।

फलटण नगर परिषदेच्या मालकीच्या इमारती, सभागृहे आणि उपनगरांना देण्यात आलेली जुनी नावे बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, या निर्णयाला शहरातील काही लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात फलटणचे नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना एक निवेदन सादर करण्यात आले असून, त्यामध्ये २५ मार्च रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ९ बाबत फेरविचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. फलटण शहराला मोठी ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभली असून, पूर्वी विशेष साधारण सभेत ठराव घेऊन दिलेली नावे बदलणे उचित ठरणार नाही, अशी भूमिका विरोध करणाऱ्या सदस्यांनी मांडली आहे. विशेषतः नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे ‘महाराजा मालोजीराव नाईक निंबाळकर भवन’ हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’ करणे, तसेच ‘श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर’ आणि ‘श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर’ यांच्या नावे असलेल्या सभागृहांची व उपनगराची नावे बदलण्यास या निवेदनाद्वारे विरोध दर्शवण्यात आला आहे.

निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महाराणी सईबाई साहेब यांच्याबद्दल सर्वांनाच नितांत आदर आहे. मात्र, या महापुरुषांची नावे देताना जुनी नावे बदलण्याऐवजी शहरातील ज्या नवीन इमारती, मुख्य रस्ते किंवा चौक अद्याप विनानाम आहेत, त्या ठिकाणी ही नावे देऊन शहराच्या नावलौकिकात भर टाकावी. विशेषतः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शॉपिंग सेंटरचे नाव बदलण्यास ठाम विरोध करताना असे स्पष्ट करण्यात आले आहे की, शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर विस्थापित झालेल्या छोट्या व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी रामराजे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, त्यामुळे त्या इमारतीला त्यांचे नाव देणे पूर्णतः संयुक्तिक आहे. जुनी नावे बदलण्याचा निर्णय झाल्यास त्याला तीव्र विरोध राहील, असे स्पष्ट करत हा ठराव मागे घेण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनावर शहरातील शिवसेना नगरसेवकांसह नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Spread the love