फलटणमधील ‘श्रीमंत संजीवराजे नगर’चे नाव बदलण्यास नागरिकांचा तीव्र विरोध; नगराध्यक्षांना निवेदनाद्वारे साकडे

गेल्या ४१ वर्षांपासून प्रचलित असलेले नाव बदलणे गैरसोयीचे असल्याचे सांगत, जुनेच नाव कायम ठेवण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे.

। लोकजागर । फलटण । २५ मार्च २०२६ ।

फलटण नगरपरिषद हद्दीतील मुख्य चौक आणि शहरातील काही भागांचे नामकरण तसेच नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती व सभागृहांची नावे बदलण्याची बाब सध्या प्रशासनाच्या विचाराधीन आहे. या पार्श्वभूमीवर, फलटणमधील ‘श्रीमंत संजीवराजे नगर’ या भागाचे नाव बदलू नये, अशी आग्रही मागणी स्थानिक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे नगराध्यक्षांकडे केली आहे. प्रस्तावित बदलांमध्ये राष्ट्रीय महापुरुषांची नावे देण्याचे नियोजन असले तरी, जुनी नावे बदलल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल, असा सूर रहिवाशांनी आळवला आहे.

‘श्रीमंत संजीवराजे नगर’ हे नाव या जमिनीचे मूळ मालक धनराज नाईक निंबाळकर, नानासाहेब निंबाळकर, दत्ताजीराव निंबाळकर, रामदास निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेले आहे. गेल्या ४१ वर्षांपासून हेच नाव सर्वत्र प्रचलित असून नगरपरिषद दप्तरी, शासकीय कार्यालये, मतदार यादी तसेच नागरिकांच्या पॅन कार्ड, आधार कार्ड आणि रेशनिंग कार्डवर याच नावाचा उल्लेख आहे. आता अचानक नाव बदलल्यास पत्त्यांमध्ये होणारे बदल तांत्रिकदृष्ट्या सर्वांसाठीच त्रासदायक ठरणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

सुजाण नागरिक म्हणून महापुरुषांच्या नावांना आमचा कोणताही विरोध नसून त्यांच्याबद्दल मनात नितांत आदरच आहे, असे नागरिकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, महापुरुषांचा योग्य सन्मान राखण्यासाठी प्रशासनाने शहरात नव्याने विकसित होणाऱ्या परिसराला किंवा नवीन इमारतींना त्यांची नावे द्यावीत, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर प्रा. डॉ. सुधीर इंगळे, उत्तमराव रणवरे, अनिल पाटील , लक्ष्मण निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या आणि रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Spread the love