साठेबाजी किंवा काळाबाजार करणाऱ्यांवर ‘जीवनावश्यक वस्तू कायद्या’नुसार कठोर कारवाई होणार; आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुरवठा विभाग सतर्क.
। लोकजागर । सातारा । २६ मार्च २०२६ ।
आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि विशेषतः आखाती देशांमधील सध्याची युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा दिला आहे. सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, IOCL, BPCL आणि HPCL या तिन्ही प्रमुख ऑईल कंपन्यांच्या सेल्स ऑफिसरनी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसल्याची पुष्टी केली आहे. काही पेट्रोल पंपांवर केवळ ‘ॲडव्हान्स पेमेंट’ (Advance Payment) या तांत्रिक प्रणालीमुळे पुरवठ्यात तात्पुरती अडचण आली होती, मात्र साठा पुरेसा आहे. युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा अनधिकृत साठा करणे किंवा चढ्या दराने विक्री करणे हा ‘जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५’ नुसार गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारची कृती करणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव, प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधन साठवणे हे अत्यंत धोकादायक आणि सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन आहे. जर एखादा पंप चालक बाटलीत इंधन देताना किंवा साठेबाजी करताना आढळल्यास, पूर्वसूचनेशिवाय संबंधित चालक आणि ग्राहक या दोघांवरही कठोर कारवाई केली जाईल आणि पंपाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस केली जाईल. नागरिकांनी अशा बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी केले आहे.
