प्रशासकीय दरारा, पहाटेचा कामाचा धडाका आणि ‘बारामती पॅटर्न’चे नियोजन पुढच्या पिढीला अभ्यासता यावे, यासाठी विशेष पाठाचा समावेश करण्याची विनंती.
। लोकजागर । मुंबई । २६ मार्च २०२६ ।
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा प्रशासकीय दरारा, कामाचा वेग आणि विकासाची दूरदृष्टी आता पुढच्या पिढीला अभ्यासता यावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्यावर आधारित एक विशेष धडा शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात यावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजकुमार बडोले यांनी आज विधानसभेत केली. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना बडोले यांनी अजितदादांच्या कार्यशैलीचे विविध पैलू मांडत, शिक्षण विभागाने हा विषय गांभीर्याने घेण्याचे आवाहन केले.
आमदार बडोले यांनी सभागृहात अजितदादांच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, वक्तशीरपणा आणि कठोर आर्थिक शिस्तीचा आवर्जून उल्लेख केला. “अजितदादांची पहाटे ५ वाजल्यापासून कामाला सुरुवात करण्याची पद्धत आणि प्रशासकीय कामांचा निपटारा करण्याचा त्यांचा ‘ट्रेडमार्क’ पॅटर्न सर्वश्रुत आहे. राज्याच्या तिजोरीचा कणा मानल्या जाणाऱ्या अर्थमंत्रालयावर त्यांची असलेली पकड आणि सरकारी निधीचा विनियोग करताना पाळली जाणारी पारदर्शकता हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अभ्यासाचा विषय ठरू शकतो,” असे बडोले यावेळी म्हणाले.
यावेळी त्यांनी ‘बारामती पॅटर्न’चा विशेष उल्लेख करत, तेथील आधुनिक शेती, शिक्षण आणि उद्योगांमधील प्रगती हे अजितदादांच्या नियोजनाचे यश असल्याचे सांगितले. दादांचा ‘जनता दरबार’ हा लोकशाहीतील जनसंवादाचा उत्तम नमुना होता. तसेच, कोणतेही बांधकाम करताना ५० वर्षांचा विचार करून त्याची गुणवत्ता राखण्याचा त्यांचा आग्रह आणि प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) सारख्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची त्यांची वृत्ती, या गोष्टी शालेय स्तरावर शिकवल्या जाव्यात, असा आग्रह त्यांनी धरला.
यापूर्वी आमदार अमोल मिटकरी यांनीही शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून अशीच मागणी केली होती. अजितदादांच्या कामात केवळ राजकारण नसून समाजकारण आणि विकासाचा ध्यास होता. त्यांचा सर्वधर्मसमभावाचा विचार आणि जनतेशी असलेली बांधिलकी विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरू शकते, असे मत आमदार राजकुमार बडोले यांनी सभागृहात मांडले. या मागणीमुळे आता शिक्षण विभाग काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
