‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमात सातारा जिल्हा परिषदेला १०० टक्के गुण; पारदर्शक आणि गतिमान प्रशासनाबद्दल सह्याद्री अतिथीगृहावर सन्मान.
। लोकजागर । सातारा । ३० मार्च २०२६ ।
महाराष्ट्र शासनाच्या ‘१५० दिवस सेवाकर्मी’ कार्यक्रमांतर्गत कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक आणि गतिमान सुप्रशासन राबवल्याबद्दल सातारा जिल्हा परिषदेने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांना प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या सोहळ्याला माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आणि मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
शासनामार्फत ६ मे २०२५ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत राबवण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने ८० पैकी ८० असे १०० टक्के गुण मिळवत सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदांच्या यादीत स्थान पटकावले. या मोहिमेत प्रामुख्याने आस्थापना विषयक बाबी अद्ययावत करणे, सर्व संवर्गातील पदोन्नती व सरळ सेवा नियुक्त्या देणे, बिंदुनामावली (रॉस्टर) प्रमाणीकरण करणे, १०० टक्के अनुकंपा नियुक्त्या पूर्ण करणे आणि कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता.
तसेच, केंद्राच्या ‘IGOT’ ऑनलाइन पोर्टलवर कर्मचाऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून पाच प्रशिक्षणे पूर्ण करण्यातही सातारा जिल्हा परिषदेने आघाडी घेतली. या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करताना मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या की, “हा पुरस्कार म्हणजे सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. भविष्यातही अशाच सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवला जाईल.” या यशाबद्दल जिल्हा परिषदेच्या सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
