खटके वस्ती येथील विजय संकल्प मेळाव्यात तरुणांना राजकीय प्रलोभनांपासून सावध राहण्याचे आवाहन; संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास.
। लोकजागर । फलटण । ३० मार्च २०२६ ।
“नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जे अभूतपूर्व राजकारण आपण पाहिले, ते यापूर्वी कधीही अनुभवास आले नव्हते. मात्र, जोपर्यंत सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, तोपर्यंत किती लोक विरोधात आले आणि गेले याची आम्ही पर्वा करत नाही,” अशा शब्दांत महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला. फलटण तालुक्यातील खटके वस्ती येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘विजय संकल्प मेळाव्या’त ते बोलत होते.
यावेळी रामराजे यांनी विशेषतः तरुण पिढीला राजकीय परिस्थितीचे डोळसपणे निरीक्षण करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “सत्तेसाठी कोण कोणत्या थराला जाईल, याला आता मर्यादा राहिलेली नाही. दोन, पाच किंवा दहा हजारांच्या प्रलोभनाला बळी पडून आपले पवित्र मत विकू नका. ग्रामपंचायत निवडणुकीत विविध प्रलोभने दिली जातात, त्यापासून तुम्हाला केवळ सावध करायचे आहे.” खटके वस्ती आणि गोखळी ही दोन्ही ‘क्रांतिकारक’ गावे असल्याचे सांगत, पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.
याप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी निवडणुकांबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. “वरुण राजाच्या कृपेने सुरू झालेला हा मेळावा विजयाचे संकेत देत असून, येणाऱ्या निवडणुकांमध्ये खटके वस्तीसह पंचक्रोशीत आपल्याच विचारांचा सरपंच विराजमान होईल,” असे ते म्हणाले. संजीवराजे यांनी बापूराव गावडे यांच्या विकासकामांचे कौतुक करत, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत कार्यकर्त्यांनी एकजुटीने उतरून मतांचा उच्चांक गाठावा, असे आवाहन केले. या मेळाव्याला पंचक्रोशीतील नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
