। लोकजागर । मनोरंजन । दि. १६ फेब्रुवारी २०२५ ।
आज सकाळीच छावा चित्रपटाचा पहिला शो पाहून आलो. स्वराज्याचे दुसरे छत्रपती,परमप्रतापी, धर्मवीर, स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांच्या पराक्रमावर, शौर्यावर, बलिदानावर चित्रपट येतो आहे याची आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यात नक्की काय घडले ते कसे दाखवणार याची प्रचंड उत्कंठा गेल्या पंधरा दिवसापासून प्रेक्षकांना होतीच. भल्या पहाटे मला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद दिसला. या भारतभूमीची रक्षा करणाऱ्या हिमालयाची उंची या चित्रपटातून छत्रपती संभाजी महाराजांना लाभली असेच म्हणायला हवे. स्वराज्य म्हणजे काय ? मराठा म्हणजे काय ? महाराष्ट्र ‘महा’ म्हणजे काय ? स्वराज्यात संभाजी महाराजांच्या आयुष्यात काय घडले ? संभाजी महाराजांनी कशासाठी बलिदान दिले? या प्रश्नांची उत्तरे देशवासियांना हा चित्रपट पाहून समजतील. सुरुवातीपासून म्हणजे बुऱ्हाणपूरच्या लढाईपासून हा चित्रपट आपला ताबा घेतो. पुढे उत्कंठा वाढवत मन घट्ट करायला लावतो आणि शेवटी डोळ्यातून अश्रू ओघळवायला लावतो. चित्रपट निशब्द करतो. चित्रपटातील भव्यता, व्यापकता, लढाई, शौर्य आणि कौर्य त्याचबरोबर हळवे दृश्य सर्वच सर्व अप्रतिम उठवले आहे.
देशभरातल्या इतर प्रांतातील अमराठी भाषिकांना ज्यांना फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे आणि ज्यांना संभाजी महाराजांच्या बलिदानाचा इतिहास माहित नाही त्यांना १७ व्या शतकातील मराठा साम्राज्याचा इतिहास समजेल अशी मांडणी उत्तमरीत्या केली आहे. गनिमी काव्याने किंवा बेदरकारपणे मरणाला न घाबरता मराठा योद्धा लढण्यासाठी कसा सिद्ध होतो हे ऍक्शन दृश्यांद्वारे दाखवले आहे. गोरिला युद्ध तंत्र हे भारतीय चित्रपटांत चित्रपटातून दाखवले नव्हते, ते वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगात म्हणजे जमिनीवरचे युद्ध, पाण्यातील युद्ध, अग्नीचा वापर करून आणि हवेतून उड्या मारून अप्रतिमपणे चित्रित केले आहे.
विकी कौशलच्या आयुष्यातील ही अप्रतिम फिल्म ठरावी. त्याच्या नजरेतील आग आणि त्याची हर हर महादेवची गर्जना टॉकीजमध्ये ऊर्जा निर्माण करते. विकी कौशलने खूप जीव ओतून काम केलेय. शेर शिवाजी का छावा जखमी झाल्यानंतर कसा थरकाप उडवतो ते रोमांच पाहताना आणि ऐकताना रौद्र रूप अनुभवायला मिळते. रश्मीका मंदाना सोज्वळ तितकीच कणखर मराठा स्त्रीची भूमिका समर्थपणे निभावताना दिसली. औरंगजेबाची भूमिका करताना अक्षय खन्ना यांची अस्वस्थपणे थरथणारी देहबोली, चालतानाची हतबलता, ओठांची हालचाल, भेदक कट्टरपणा आणि वृद्धत्वाकडे झुकलेला त्याला केलेला साजेसा मेकअप साक्षात टोप्या विणणारा पाताळयंत्री औरंगजेब असाच असावा याचा भास होतो. अक्षयच्या आयुष्यातील सुद्धा अभिनयाची उंची गाठणारी ही भूमिका असावी.

संभाजी महाराजांचेच नातलग गणोजी आणि राणोजी शिर्के यांनी फितुरी केल्यानंतर संभाजी राजांना संगमेश्वरला पकडले जाते. त्यापूर्वीची घनघोर लढाई पडद्यावर नव्हे तर प्रत्यक्ष रणांगणावरच पाहतो आहोत असे वाटते. संभाजी महाराजांचे लढाईतले प्राविण्य आणि शस्त्र-अस्त्रांचा सफाईने केलेला वापर कुठेही नकली वाटत नाही. पकडल्यानंतर ४० दिवस अतोनात अत्याचार केले जातात. साखळदंडमध्ये जखडलेल्या अवस्थेत उभ्या उभ्या प्राण सोडताना जेव्हा संभाजी महाराज ‘आईसाहेब’ बोलतात तेव्हा आपण गहिवरतो, लटपटतो आणि संतापून रक्त खवळते. इतके परिणामकारक दृश्य दिग्दर्शक उतेकरांनी उभे केले आहे काळालाही दरदरून घाम फोडणारा हा नृसिंह शिवप्रभूंच्या छावा हातापायात साखळदंड बांधलेला असतानाही या छाव्याला कुणी जखडून ठेऊ शकत नाही हा प्रसंग संभाजी महाराजांची अचाट ताकद दाखवतो. शरणांगत होण्यासाठी जखमेवर मीठ चोळले जाते, नखे उपटली जातात, जीभही उपटली जाते. आणि औरंग्यासमोर कधीही न झुकणारी नजर कायमची बंद करण्यासाठी डोळेही काढले जातात हे सर्व पाहताना पडद्यावरची कळ आणि त्यांच्या तोंडून उमटणारा जगदंब हे शब्द प्रेक्षकांच्या हृदयात खोलवर घुसतात. हे दुर्दैवी प्रसंग काळजावर दगड ठेवून बघावे लागतात. या वेदनेसह भलमोठं दुःख घेऊन आपल्याला चित्रपटगृहाबाहेर पडावे लागते. शेवटची २५ मिनिटे खूपच अस्वस्थ करून जातात. पडद्यावरील यातना पाहाताना आपल्याला सहन होत नाहीत, राजांनी त्या कशा सहन केल्या असतील. “संभा अपनी मौत का जश्न मनाकर चला गया और हमे छोड गया अपनी जिंदगी का मातम मनाने”
महाराष्ट्रातल्या मराठी बांधवानी आपल्या कुटुंबासह हा चित्रपट का पाहावा तर या चित्रपटाने मराठी माणसांची आणि महाराष्ट्राच्या इतिहासाची पुनर्बांधणी केली आहे. हा चित्रपट देशभरच्या तरुणांना प्रेरणा देणार, चेतना आणि देशप्रेम जागविणार. आणि हो …..चित्रपट जरी शेर का छावा म्हणजे शंभुराजे या इतिहासातील व्यक्तिरेखेवर आधारित असला तरी आबासाहेब म्हणजे थोरले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासाठी लक्ष्मण उतेकरांनी आवाज दिला आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील अवघड प्रसंगात तो धीर देणारा आश्वासक म्हणून वापरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची उणीव न भासवता हा आवाज सातत्याने चित्रपट व्यापून जातो आहे. चित्रपटाचे संगीत वेदनादायी आणि परिणामकारकता कसे असू शकते हे ए आर रेहमान यांनी ऐकवले आहे. ‘लक्ष्मण उतेकर’ हे नाव आज देशभर प्रेक्षकांच्या तोंडावर आहे. एक नयनरम्य, चित्तथरारक रोमहर्षक प्रेरणादायी अप्रतिम कलाकृती साकारली आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर, बलिदानावर “छावा ” चित्रपट करून निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यासर्वांनी अमूल्य असे कार्य केले आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन! मराठी माणसांनी एकत्र येऊन …छत्रपती संभाजी महाराजांच्या समर्पणाची गाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रत्यक्ष जायला हवे…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांना विनंती आहे की, संभाजी महाराजांचे शौर्य अधिकाधिक लोकांनी पाहावे आणि त्यांच्या बलिदानातून तरुणांनी मोटिव्हेशन घ्यावे यासाठी हा चित्रपट करमुक्त करावा.
- रवींद्र मालुसरे, अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई. ९३२३११७७०४.