फलटणचे प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांना निवेदन देताना श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाचे पदाधिकारी, सदस्य.
। लोकजागर । फलटण । दि. २४ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण शहरातील आठवडा बाजार रविवार पेठ व माळजाई मंदिर येथे भरण्याबाबत संभ्रम असून पालिकेने हा आठवडा बाजार गेले काही दिवस रविवार पेठ येथे भरवला होता. मात्र तालुक्याच्या बाहेरील भाजी विक्रेत्यांच्या विरोधामुळे आठवडा बाजार गेले दोन रविवार माळजाई मंदिर परिसरात भरवला जात आहे. हा बाजार माळजाई मंदिर परिसरात भरविला तर रविवार पेठ बाजारातील व्यापारी वर्गाचे उद्योगधंदे मोडकळीस येतील, त्यामुळे आठवडा बाजार रविवार पेठेतच भरवण्यात यावा, या मागणीचे निवेदन श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाच्यावतीने आज फलटण नगरपालिका, फलटण प्रांत कार्यालय व फलटण पोलीस प्रशासनाला देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माळजार्ई मंदिर हा फलटण शहराचा पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे आठवडा बाजार भरवून पर्यटक व शहरातील वयोवृद्ध लोकांसाठी त्रासदायक आहे. फलटण शहरातील बाजारामध्ये आपल्या शेजारील तालुक्यातील भाजी विक्रेते आठवडा बाजारावेळी माळजाई परिसरामध्ये विक्रीला येत असून त्यांच्यामुळे स्थानिक भाजी विक्रेते यांच्यावर अन्याय होत आहे. आठवडा बाजाराबाबत निर्णय घेताना आठवडा बाजाराचे तुकडे तुकडे होतील असा निर्णय प्रशासनाने घेवू नये, अशी विनंतीही या निवेदनात करण्यात आली आहे.
या निवेदनावर श्रीमंत मालोजीराजे भाजी विक्रेता सामाजिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार अहिवळे, उपाध्यक्ष कादरभाई बागवान, उपाध्यक्ष अरुण अहिवळे, सचिव नितिन घोडके, सदस्य बापूराव भोसले यांच्यासह सुमारे 192 भाजी विक्रेत्यांच्या स्वाक्षर्या आहेत.