। लोकजागर । फलटण । दि. १५ एप्रिल २०२५ ।
फलटणचे माजी नगराध्यक्ष, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाला रामराम ठोकत भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

भाजपा प्रदेश कार्यालय, मुंबई येथे हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दिलीपसिंह भोसले यांच्यासमवेत श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले व त्यांच्यासमवेत श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहातील पदाधिकार्यांनीही भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
फलटण शहराच्या विकासात मोठे योगदान
सुमारे 1974 पासून फलटणच्या राजकीय, सामाजिक चळवळीत अग्रेसर असणारे दिलीपसिंह भोसले यांनी त्यावेळेच्या फलटण शहर युवक संघटनेच्या माध्यमातून लक्षवेधी कामाला सुरुवात केली. पुढे 1978 साली झालेल्या फलटण नगरपालिकेच्या निवडणूकीत प्रस्थापित राजकारणाला छेद देत नागरी संघटनेला घवघवीत यश मिळवून देण्यातही दिलीपसिंह भोसले यांनी मोलाचा वाटा उचलला होता. त्यानंतर फलटण नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली. त्यांचा नगराध्यक्षपदाचा काळ हा नगरपरिषदेतील कामांचा सुवर्णकाळ होता. याच काळात प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन उभारले गेले. हे देखणे सभागृह झाल्यामुळे फलटणकरांना साहित्य, कला, नाट्य क्षेत्रातील अनेक दिग्गजांचे कार्यक्रम पाहता आले. साक्षात गानकोकिळा लता मंगेशकर यांचाही या भवनमध्ये कार्यक्रम झाला. सन 2016 सालच्या नगरपालिका निवडणूकीतही त्यांच्या पत्नी अॅड.सौ.मधुबाला भोसले यांनी नगरसेवक होण्याचा बहुमान मिळवला.
सहकार, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम
राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात दिलेल्या योगदानाबरोबरच दिलीपसिंह भोसले यांची सहकार क्षेत्रातील जाणते व्यक्तीमत्त्व म्हणून सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ओळख आहे. त्यांच्या नेतृत्त्वात सुरु असलेल्या श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था, महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी, श्रीराम बझार, सहकार महर्षी हणमंतराव पवार सहकारी कुक्कुटपालन संस्था आदी संस्थांच्या पारदर्शक कारभारामुळे फलटणच्या नावलौकीकात भर पाडण्याचे काम दिलीपसिंह भोसले यांनी केले आहे. सहकाराबरोबरच श्री सद्गुरु प्रतिष्ठान व श्री सद्गुरु शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात दिलीपसिंह भोसले यांचे मोठे योगदान आहे.
भारतीय जनता पार्टीला समाजकारणासाठी मिळाले मोठे नेतृत्त्व
दरम्यान, दिलीपसिंह भोसले यांच्या भाजप पक्ष प्रवेशामुळे फलटण शहरासह तालुक्यातील भारतीय जनता पक्षाला राजकारणासह समाजकारणासाठी तगडे नेतृत्त्व मिळाले असल्याचे मत फलटणकरांमधून व्यक्त होत आहे.
या पक्ष प्रवेशावेळी फलटणच्या माजी नगरसेविका तथा स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अॅड. सौ. मधुबाला भोसले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप, भारतीय जनता पार्टीचे जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, संदीप चोरमले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
