यंदा फलटण रायडर्स करणार सायकल वारी; २१ जूनला पंढरपूरकडे प्रस्थान

। लोकजागर । फलटण । दि. 17 जून 2025 ।

आषाढी एकादशी निमित्त फलटण रायडर्स यांनी सायकल वारीचे प्रथमच आयोजन केले आहे. दिनांक २१जून २०२५ रोजी फलटण मधून प्रभू श्रीरामाचे दर्शन घेवून पंढरपूरसाठी फलटण रायडर्स प्रस्थान करणार आहेत. फलटण रायडर्सच्या वारीचे हे पहिलेच वर्ष असून यामध्ये फलटण व परिसरातील १२ वर्षे वयापासून ७२ वर्षे वयापर्यंतच्या सायकल पटूंचा सहभाग असणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूर येथे पोहोचतात. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनेक नैसर्गिक अडथळ्यांना पार करून लाडक्या विठुरायाचे दर्शन घेतात. त्याचपद्धतीने आपला व्यवसाय, नोकरी यामधून वेळ काढून सायकलवारी करणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत आहे. याचाच एक भाग म्हणून फलटणमधूनही सायकल वारी निघणार आहे.

दि. २१ रोजी पहाटे पाच वाजता फलटण मधून प्रस्थान केल्यानंतर प्रथम शिंगणापूर फाटा येथे या वारीचा पहिला थांबा असेल. दुसरा थांबा कुडूस येथे असून सायकलवारीतील सर्व सहभागी सदस्य भोजन व विश्रांतीसाठी चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी थांबणार आहेत. त्यानंतर ही वारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पंढरपूर मध्ये प्रवेश करणार आहे.

पंढरपूरला भरणार सायकल संमेलन
पंढरपूर मध्ये २१ जून रोजी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून ७५ ग्रुपचे तीन हजार हून अधिक सायकल स्वार दाखल होणार आहेत. दिनांक २२ जून रोजी सकाळी ५:४५ वाजता सर्व सायकल स्वारांची नगर प्रदक्षिणा होणार असून त्यानंतर रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे सायकल रिंगण व सायकल संमेलन होईल. सायकल संमेलनात प्रसिद्ध भारतीय सायकलपटू अमित समर्थ यांचे सर्वांना मार्गदर्शन होणार आहे. या निमित्ताने फलटण रायडर्सच्या माध्यमातून फलटण मधून प्रथमच सहभागी होणाऱ्या ८० सायकल स्वारांना या आनंदवारीचा अनुभव घेता येणार आहे.

Spread the love