ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीची वाढीव रक्कम मिळावी; अन्यथा स्वातंत्र्यदिनी उपोषण

। लोकजागर । फलटण । दि. 29 जुलै 2025 ।

राज्य शासनातर्फे देण्यात येत असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील मंजूर झालेली सन्मान निधीची वाढीव रक्कम अद्याप लाभार्थी पत्रकारांना अदा झालेली नाही. सदरची रक्कम फरक रक्कमेसह दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी मिळावी अन्यथा या मागणीसाठी देशाच्या स्वातंत्र्यदिनी मुंबई येथे मंत्रालयासमोर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ त्यांच्या सहकार्‍यांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

राज्य शासनातर्फे देण्यात येत असलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजनेतील ज्येष्ठ पत्रकारांना सध्या दरमहा रुपये 11 हजार सन्मानधन माहिती व जनसंपर्क विभागामार्फत दिले जाते. या सन्मानधनामध्ये महाराष्ट्र शासनाने दिनांक 14 मार्च 2024 च्या शासननिर्णयानुसार दरमहा रुपये 9 हजारची वाढ मंजूर केली आहे. पण अद्यापपर्यंत ही रुपये 9 हजार ची सन्माननिधीची वाढ ज्येष्ठ पत्रकारांना मिळत नाही. म्हणून ही रुपये 9 हजाराची वाढ व एप्रिल 2024 पासून ते जुलै 2025 पर्यन्तचा मागील फरक रुपये 1 लाख 44 हजार अशी रक्कम दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी मिळावी; अन्यथा या मागणीसाठी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य जिल्हा वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ (वय 82) व त्यांचे सहकारी 15 ऑगस्ट 2025 रोजी मंत्रालयासमोर आमरण उपोषणास बसतील, असा इशारा या दोन्ही संस्थांच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघाचे प्रशासकीय संचालक अमर शेंडे यांनी दिली.

Spread the love