साताऱ्यात साहित्य शिल्प उभारावे; अश्वमेध ग्रंथालयाच्या वतीने शिवेंद्रसिंहराजे भोसलेंकडे मागणी

। लोकजागर । सातारा । दि. 29 जुलै 2025 ।

येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साहित्य शिल्प साकारण्यात यावे, अशी मागणी अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना ग्रंथालयाचे संस्थापक रवींद्र भारती-झुटिंग यांनी निवेदन दिले.

यावेळी ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र माने, विश्वस्त प्रा. श्रीधर साळुंखे, डी. एम. मोहिते, आनंदा ननावरे, गौतम भोसले व नीलेश पवार उपस्थित होते. साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचा सत्कार करण्यात आला.

ग्रंथालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी आपण दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहेच. आपल्या नेतृत्वाखाली हे साहित्य संमेलन राजधानी साताऱ्याचा लौकिक वृद्धिंगत करणारे ठरेल, याचा आम्हाला विश्वास आहे. साताऱ्यात होणाऱ्या शतकपूर्व साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा नगरपालिकेच्या माध्यमातून सातारा शहरातील एका चौकात साहित्य शिल्प साकारून हा चौक सुशोभित करावा. या शिल्पाच्या उभारणीमुळे साताऱ्यात होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे चिरंतन स्मरण होत राहील. या साहित्य शिल्पाचा लोकार्पण सोहळा संमेलनाच्या प्रथम दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावा, ही सर्व साहित्यिक व साहित्यप्रेमींची मागणी आहे.

Spread the love