नागपंचमीदिवशी श्रीराम एज्युकेशन सोसायटीत सर्पमित्रांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
| लोकजागर | फलटण | दि. ३१ जुलै २०२५ |
आपण आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवावा त्यामुळे साप आसपास त्याचे भक्ष्य शोधण्यासाठी येणार नाहीत, साप दिसल्यानंतर त्याला मारू नका व घाबरू नका, असा संदेश सर्पमित्र निलेश गोंजारी यांनी दिला.
श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण व सौ वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या दोन्हीही शाखांच्या संयुक्त विद्यमाने प्रशालेतील विद्यार्थ्यांकरिता नागपंचमीचे औचित्य साधून सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना विविध सापांच्या जातींविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यावेळी निलेश गोंजारी बोलत होते.

यावेळी निलेश गोंजारी यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना अतिशय सविस्तर व सोप्या पद्धतीने आपल्या आसपास आढळणाऱ्या विषारी व बिनविषारी सापांची माहिती सांगितली. साप कसे ओळखावेत, सापांचे फायदे, सर्पदंश झाल्यानंतर प्रथमोपचार कसे करावेत, सर्पदंश कसे टाळावेत याबाबत विद्यार्थ्यांना फ्लेक्स च्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली. गवती साप, धामण, नाग, घोणस मण्यार, अजगर या सापांची माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली. प्रशालेने सर्प मित्रांना बोलवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रशालेचे त्यांनी आभार मानले.

प्रारंभी शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख पी. व्ही. साळुंखे यांनी सर्पमित्र निलेश गोंजारी, तेजस गोरे व मंगेश नाईक निंबाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन विद्यालयाच्या वतीने स्वागत केले. या कार्यक्रमाकरिता दोन्हीही प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षिकेतर कर्मचारी उपस्थित होते.
