विद्यार्थ्यांनी आई-वडिलांचे कष्ट लक्षात ठेवून नाव मोठे करावे : तहसीलदार डॉ. अभिजित जाधव

| लोकजागर | राजाळे  | दि. ११ सप्टेंबर २०२५ |

“विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आपल्या आई-वडिलांचे कष्ट नेहमी डोळ्यासमोर ठेवावे. त्यांचे नाव मोठे करणे हेच आपले ध्येय असले पाहिजे,” असे प्रतिपादन फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.

अजिंक्य मित्र मंडळाच्या वतीने टाकळवाडे (ता. फलटण) येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमात गावातील विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या ३० व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये शासकीय सेवेत भरती झालेली मुले, पदोन्नती मिळालेला नोकरदार वर्ग तसेच विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विजेते ठरलेले विद्यार्थी यांचा समावेश होता. सत्कारमूर्तींना शाल, ट्रॉफी व एक गुलाबाचे रोप देऊन गौरविण्यात आले.

डॉ. जाधव म्हणाले, “मंडळ विविध सामाजिक उपक्रम राबवून गावाच्या विकासात मोलाचे योगदान देत आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन यश संपादन करावे व आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे.”

सत्कारमूर्तींच्या वतीने महात्मा गांधी महाविद्यालय, दहिवडीचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब मिंड आणि फलटण शहरचे पोलिस उपनिरीक्षक अंकुश इवरे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या घडणीत गावाचा मोठा वाटा असल्याचे नमूद केले.

या प्रसंगी जानाई हायस्कूलचे शिक्षक निळकंठ निंबाळकर, प्रा. प्रवीण निंबाळकर, शिवसेना फलटण तालुका प्रमुख नानासाहेब (पिंटू) इवरे, सरपंच परिषद फलटणचे अध्यक्ष राहुल इवरे, दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी पोपट मिंड, संभाजी ढोक सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील करे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. अमोल पवार यांनी तर आभार प्रदर्शन मल्हारी जाधव यांनी केले.

सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शफिक शेख, फौजी सुजित डांबे, उत्कर्ष जाधव, प्रथमेश करे, आरिफ शेख, तुकाराम खांडेकर, कु. सनम शेख, कु. वैष्णवी जाधव यांनी परिश्रम घेतले.

Spread the love