। लोकजागर । फलटण । दि. 24 सप्टेंबर 2025 ।
शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त जय तुळजा भवानी तरुण मंडळ, अहिल्यानगर (पणदरे) यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त वाचन संस्कृतीचा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमातून मंडळाने नवरात्रीचा शुभारंभ साहित्यप्रेमी वातावरणात केला.

“पुस्तक मस्तक घडवते ते कुणापुढे नतमस्तक होत नाही, तर जग त्यांचे हस्तक होते,” या संदेशातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. वाचनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो, या जाणिवेतून गेली १४ वर्षे मंडळाकडून सातत्याने वाचन संस्कृती उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमांतर्गत विविध मराठी साहित्यकृती—कथा, काव्य, कादंबरी, नाटक, ललित लेखन, मासिके व दिवाळी अंक—यांची ओळख मुलांना करून दिली जाते. त्यामुळे त्यांच्या मनात साहित्याबद्दलची उत्सुकता निर्माण होत असून आत्मविश्वास वृद्धिंगत होत आहे. वाचन संस्कृतीतून निर्माण झालेली ही पिढी चैतन्याने भरलेली, सकारात्मक दृष्टीकोन घेऊन जीवनाची वाटचाल करत आहे.
