मसाप,पुणे शाहूपुरी शाखा, मावळा फौंडेशनतर्फे नियोजित संमेलनाध्यक्षाचा जाहीर सत्कार
। लोकजागर । सातारा । दि. 23 सप्टेंबर 2025 ।
मी साताऱ्याच्या मातीतून घडलेलो आहे. साताऱ्याची माती माझ्यासाठी पंढरीच्या बुक्क्यापेक्षाही महनीय आहे. इतिहासकार, गुरू किंवा ग्रंथ नव्हे तर महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यांतून केलेल्या अथक प्रवासात आणि स्थानिकांच्या भेटीतून मिळालेल्या माहितीतूनच मी इतिहास शिकलो आहे. माझे इमान शब्दांशी आणि महाराष्ट्राच्या भूमीशी आहे. माझ्या साहित्यसंपदेत एकही परिच्छेद चोरीचा असल्याचे सिद्ध झाल्यास मी त्या क्षणी लेखणी सोडेन, असे प्रतिआव्हान 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी साताऱ्यात दिले.

महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाहूपुरी शाखा, सातारा आणि मावळा फौंडेशनतर्फे आयोजित या संमेलनाचा जाहीर सत्कार सोहळा शाहू कलामंदिर येथे पार पडला. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या हस्ते पाटील यांचा शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र, संमेलनाचे बोधचिन्ह आणि सातारी कंदी पेढ्यांचा हार घालून गौरव करण्यात आला. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्याचे पर्यटनमंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे अध्यक्ष भगवान वैराट, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांसह मान्यवर उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, न्यायदेवता माझ्या लिखाणावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे माझ्या लेखणीतील प्रत्येक शब्द योग्य पद्धतीने मांडला जातो. मला कधीतरी संमेलनाध्यक्ष व्हायचे होते आणि साताऱ्यातील या संमेलनाचा अध्यक्ष झालो याचा मनस्वी आनंद आहे. पाटील म्हणाले, “पाटील हे नाव कुस्ती, उस किंवा तमाशाच्या फडात रमलेले दिसते. मात्र मी शब्दांच्या फडात रमणारा पाटील आहे.”
समाजमाध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. मोबाईलमधील चुकीचे संदेश, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचा इतिहास व खोटे रिल्स हे लोकांचा बुध्दीभेद करत असल्याचे ते म्हणाले. “मी वाघ वा सिंहाला घाबरत नाही, कारण ते समोरून हल्ला करतात. पण उंदरांची जात हरामी असते. ते गुपचुप कपाटात शिरून लाखो रुपयांचे शालू कुरतडतात. वारणेच्या काठावरून आलेल्या उंदरांनी उच्छाद मांडला आहे,” असे त्यांनी उदाहरण देत समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रवृत्तींचा समाचार घेतला.
ते पुढे म्हणाले, साताऱ्याच्या दऱ्याडोंगरात मोठा इतिहास दडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज हे धर्माने हिंदू असले तरी त्यांनी सर्व जातीधर्मांना आपले मानले. मराठा वा ब्राह्मण जातीने त्यांच्यावर हक्क सांगू नये. साहित्य आणि कला ही जातिविरहित असते. साताऱ्याचे शाहू महाराज यांचे स्वतंत्र मंत्रिमंडळ होते. त्याच्या शिफारशीवरूनच पेशव्यांना पंतप्रधानपद मिळाले. पानिपतपासून उत्तर पेशवाईपर्यंतचा सखोल अभ्यास नव्या पिढीसमोर मांडण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
ग्रंथालयांची दयनीय अवस्था असल्याकडे लक्ष वेधून त्यांनी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रंथदेवतेची पूजा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमात डॉ. राजा दीक्षित यांनी पाटील यांच्या लेखनातून इतिहास आणि साहित्य यांचा उत्तम संगम दिसतो, असे गौरवोद्गार काढले. अण्णा बनसोडे यांनी त्यांच्या लेखनातून अनेक दुर्लक्षित प्रश्नांना वाचा मिळाल्याचे नमूद केले. पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी संमेलनासाठी जिल्ह्यातील सर्व मंत्री, आमदार आणि प्रशासन एकजुटीने काम करेल असे सांगितले. स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाटील यांच्या लेखणीमधून शाहू महाराजांचा वैभवशाली इतिहास उजेडात आणावा, अशी मागणी केली.
या प्रसंगी छत्रपती उदयनराजे भोसले यांचा शुभेच्छा संदेश वाचून दाखविण्यात आला. त्यांनी पाटील यांची अध्यक्षपदी निवड ही ऐतिहासिक पार्श्वभूमीवर दुग्धशर्करा योग असल्याचे नमूद केले.
प्रास्ताविकात विनोद कुलकर्णी म्हणाले, वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याचे कार्य विश्वास पाटील यांच्या लेखणीने केले आहे. त्यांच्या पानिपतचे गारुड आजही कमी झालेले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठी भाषा टिकली पाहिजे हा वारसा छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांनी पुढे नेला आहे. त्यांच्या पाठींब्यामुळेच हे संमेलन सातारा येथे आयोजित करण्यात येत आहे. थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकण्याचे कार्य विश्वास पाटील यांनी करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मान्यवरांचे स्वागत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, नंदकुमार सावंत, विनोद कुलकर्णी यांनी केले. मानपत्राचे वाचन नंदकुमार सावंत यांनी केले तर सूत्रसंचालन स्नेहल दामले यांचे होते. आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले. याप्रसंगी प्रा. अजिंक्य सगरे, किशोर बेडकिहाळ, सुनील काटकर, राजूभैय्या भोसले, विक्रम पाटील, अनिल जठार, अजित साळुंखे, राजेंद्र पाटील, तुषार महामुलकर, सचिन सावंत, शिरीष चिटणीस, डॉ. राजेंद्र माने, यशवंत पाटणे, प्रकाश गवळी, अमोल मोहिते, डॉ. चित्रलेखा माने-कदम, हरिष पाटणे, डॉ. संदीप श्रोत्री, सतिष घोरपडे, वजीर नदाफ, संपत जाधव, अमर बेंद्रे, अमित कुलकर्णी मंचावर होते.
सभागृहात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यात झालेल्या निधी संदर्भातील हलक्याफुलक्या चर्चेवरून उपस्थितांमध्ये हशा पिकला आणि संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावर एकजुटीचे वातावरण दिसून आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले, आभार ॲड. चंद्रकांत बेबले यांनी मानले.
