श्रीमती दुर्गाबाई शिंदे यांचा नवदुर्ग मंडळात गौरवपूर्ण सत्कार

। लोकजागर । फलटण । दि. 11 ऑक्टोबर 2025 ।

नवदुर्ग गणेश उत्सव मंडळाच्या वतीने नारीशक्तीचा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला. आयुष्यातील कितीही संकटांना सामोरे जात मोठ्या धैर्याने संसार सुखाचा उभारलेली आणि आपल्या कार्यातून समाजात प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणार्‍या श्रीमती दुर्गाबाई बाळासाहेब शिंदे यांचा सन्मान सोहळा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मंडळाच्या ‘दुर्गामातेचा सन्मान’ या उपक्रमांतर्गत हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
श्रीमती दुर्गाबाई शिंदे यांनी पाच मुली आणि सात महिन्यांच्या मुलासह पतीच्या अकस्मात निधनानंतरही खंबीरपणे आयुष्याचा सामना केला. सुरुवातीस थोडीफार मदत मिळाल्यानंतर, त्यांनी स्वतःच्या पतीची शेती स्वतः सांभाळत आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारला. भाजीपाला, गहू, ज्वारी, ऊस अशी विविध पिके घेऊन त्यांनी केवळ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला नाही, तर मुलांच्या शिक्षणालाही प्राधान्य दिले.

त्यांच्या अथक परिश्रमांतून आज त्यांच्या पाचही मुली सुखी संसार करत असून मुलगा चारचाकी आणि दुचाकी पेंटिंग व्यवसायात यशस्वीपणे स्थिर झाला आहे. श्रीमती शिंदे आजही शेतात नित्यनेमाने काम करत असून त्यांचे आयुष्य ही खरी प्रेरणादायी कहाणी आहे.

या गौरव सोहळ्यास सौ. सपना विशाल निंबाळकर, सौ. वंदना प्रदीप शिंदे, कु. शुभ्रा विशाल निंबाळकर, सौ. वर्षा पोपटराव बर्गे, सौ. अपूर्वा अजय देवळे, सौ. श्वेता विक्रम निंबाळकर, कु. अवंतीका विक्रम निंबाळकर आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
मंडळाचे अध्यक्ष पोपटराव बर्गे तसेच विशाल निंबाळकर, धिरज व्होरा, विक्रम निंबाळकर, प्रदीप शिंदे, दतराज निंबाळकर, पवन बर्गे, पृथ्वीराज शिंदे, अथर्व निंबाळकर, जय कोरडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

संध्याकाळी सहा वाजता झालेल्या या सोहळ्यात उपस्थित सर्वांनी दुर्गाबाई शिंदे यांच्या जिद्दीचा आणि मातृत्वाचा गौरव केला. महिलांच्या सबलीकरणाचे प्रतिक ठरलेल्या अशा दुर्गामातेचा सन्मान या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Spread the love