। लोकजागर । फलटण । दि. 22 ऑक्टोबर 2025 ।
श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी पालखी रथ सोहळा मोठ्या भक्तिभावाने आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, दि. 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता श्री स्वामी समर्थ मंदिर, फलटण येथून या सोहळ्याची सुरुवात होणार आहे. या पालखीचे अखेरचे आगमन गुरुवार, दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी श्री क्षेत्र अक्कलकोट येथे होईल, अशी माहिती श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाचे प्रमुख संजय चोरमले यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती देताना संजय चोरमले यांनी सांगितले की, पालखी सोहळ्याचे यंदा 7 वे वर्ष असून प्रस्थान दि.24 रोजी अहिल्यानगर (गजानन चौक, फलटण) येथून मिरवणूकीने होणार आहे. सोहळ्याचा मुक्काम दि.24 रोजी महादेव मंदिर – गणेशशेरी, दि. 25 रोजी वाजेगाव, दि. 26 रोजी नातेपुते, दि. 27 रोजी साठफाटा – माळशिरस, दि. 28 रोजी तोंडले, दि. 29 रोजी पंढरपूर, दि. 30 रोजी सुस्ते, दि. 31 रोजी वरकुटे, दि. 1 रोजी कामथी, दि. 2 रोजी बेलाटी, देगांव, दि. 3 रोजी कुंभारी, दि. 4 रोजी कान्होळी, दि. 5 रोजी अक्कलकोट असा राहणार आहे. या पवित्र यात्रेदरम्यान फलटणपासून ते अक्कलकोटपर्यंत अनेक गावांतील भक्त मंडळी मोठ्या उत्साहाने आणि श्रध्देने सहभागी होतात. दररोज होणारे कीर्तन, नामस्मरण, महाप्रसाद आणि आरती यामुळे वातावरण अत्यंत पवित्र आणि मंगलमय बनते.

इरादे शेकडो बनते हैं, बनकर टूट जाते हैं; अक्कलकोट वही जाते हैं, जिन्हें स्वामी बुलाते हैं या भावपूर्ण घोषवाक्याने भक्तांना प्रेरणा देत यात्रेचे आयोजन केले गेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि मंडळाच्या अखंड सेवाभावाने ही यात्रा भक्तांच्या आध्यात्मिक उन्नतीचे साधन ठरते आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी सर्व भक्तांनी पारंपरिक पोशाखात, अनुशासन आणि स्वच्छता राखून सहभागी व्हावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
या पवित्र प्रसंगी श्री स्वामी समर्थ महाराजांचे साक्षात आशीर्वाद लाभावे आणि सर्वांच्या जीवनात शांती, समाधान व सद्भाव नांदो, अशी मंगलकामना श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटण यांनी व्यक्त केली आहे.
तू निश्चित जा मी आहे… – या वचनाने प्रेरित होऊन सर्व भक्त मंडळी अक्कलकोटच्या दिशेने निघणार आहेत.
