। लोकजागर । फलटण । दि. 26 ऑक्टोबर 2025 ।
‘‘आजचा दिवस संघर्षातून उभा राहिला आहे. रणजितदादांना अजून खूप कामं करायची आहेत. चिंता करु नका आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही हाती घेतलेला संघर्ष पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही’’, अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
फलटण येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, फलटण – कोरेगांवचे आमदार सचिन पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, उच्च पदस्थ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.
पाण्याचं स्वप्न ‘त्यांना’ कागदावरचं ठेवायचं होतं : फडणवीसांचा खोचक टोला
ना. फडणवीस पुढे म्हणाले, ‘‘फलटणच्या ऐतिहासिक भूमीत रणजितदादा आणि आ. सचिन पाटील यांच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे समाधानकारक आहेत. निरा देवधरचं काम यापूर्वीही होऊ शकलं असतं. परंतु त्याकाळामध्ये राज्याचं नेतृत्त्व करणारी काही मंडळी निरा देवधरचं पाणी फलटण, माळशिरसमध्ये पाणी पोचवू शकले असते. पण त्यांना हे स्वप्नं केवळ कागदावर ठेवायचं होतं त्यामुळं हे पाणी पोहचू शकलं नाही. रणजितदादांनी हे पाणी मिळवण्याचा विडा उचलला. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून यातील सगळ्या अडचणी दूर केल्या.’’
फलटणकरांचे जीवन सुकर होणार : फडणवीसांचा विश्वास
‘‘जिल्ह्याच्या ठिकाणी असणार्या सर्व व्यवस्था रणजितदादा आणि सचिन पाटील यांनी फलटणला आणल्या आहेत. यामुळे नागरिकांचं जीवन मोठ्या प्रमाणात सुकर होणार आहे. एवढ्यावरच हे थांबले नसून आत्ताही त्यांनी 11 मागण्या माझ्याकडे केल्या आहेत. पण हरकत नाही जो खरा जननेता असतो त्याला शेवटच्या माणसाचा विकास होईपर्यंत समाधान लाभत नाही’’, असेही ना. फडणवीस यावेळी म्हणाले.
थोडी जरी शंका असती तर कार्यक्रम रद्द केला असता : फडणवीसांकडून पाठराखण
‘‘डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. या प्रकरणातील सत्य बाहेर येत आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्या या लहान भगिनीला न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. मी या कार्यक्रमाला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न इथे झाला. प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवण्याचा निंदनीय प्रयत्न होताना इथे पहायला मिळाला. काहीही कारण नसताना रणजितदादांच, सचिन पाटील यांचं नाव यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण महाराष्ट्राला हा देवाभाऊ माहिती आहे, थोडीशी जरी शंका असती तर कार्यक्रम रद्द केला असता आणि इथे आलो नसतो. अशा बाबतीत मी पक्ष, व्यक्ती, राजकारण पाहत नाही, कुठलाही समझोता मी करत नाही. प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका कुणी घेत असेल तर ते आपण सहन करणार नाही’’, अशा शब्दात फडणवीसांनी रणजितदादांची पाठराखण केली.
देवेंद्र फडणवीस आधुनिक भगीरथ : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे
‘‘पाणी देणारं जलसंपदा खातं फलटणला असूूनसुद्धा या भागाला पाण्यापासून वंचित ठेवलं गेलं. जाणीवपूर्वक दुष्काळी ठेवण्यात आलेल्या जनतेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर न्याय मिळाला’’, असे सांगून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘आधुनिक भगीरथ’ असा गौरव केला. ‘‘लोकसभेच्या पराभवानंतरही रणजितदादा खचून न बसता, तिसर्या दिवशी कामाला लागले. त्यांच्या नेतृत्वाखाली सचिनदादांनी अशक्य विजय मिळवला आणि खर्या अर्थाने फलटण ‘स्वतंत्र’ झाले. महाभारत असो वा रामायण, प्रत्येक युद्धाला एक शकुनी मामा कारणीभूत असतो. असाच एक शकुनी मामा फलटणमध्येही आहे, जो केवळ षडयंत्र करण्याचेच काम करतो. पण षडयंत्रकारी कधीही जिंकत नाही’’, असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
देवेंद्र फडणवीस आमच्यासाठी देवमाणूस : रणजितसिंह नाईक निंबाळकर
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात, ‘‘फलटणच्या जनतेच्या 70 वर्षांच्या पाणी संघर्षाला मुख्यमंत्र्यांनीच न्याय दिला. मुख्यमंत्री आमच्यासाठी ‘देवमाणूस’ आहेत’’, असे सांगून ‘‘चांगले काम करुनही लोकसभा निवडणूकीत माझा पराभव झाला. पण त्या पराभवातून मी खचलो नाही. दुसर्या दिवशी कामाला सुरुवात केली आणि विधानसभेची जागा जिंकून दाखवली. आपल्याला कुणाचाही ‘बदला’ घ्यायचा नाहीये तर तालुक्यात ‘बदलाव’ घडावायचाय’’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर कोरेगावच्या 26 गावांना पाणी द्या : आमदार सचिन पाटील
आमदार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात त्यांचे राजकीय गुरू दिवंगत हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या पाणी संघर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीच माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकर्याच्या मुलाला आमदार बनवले, अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, वसना प्रकल्पातील मंजूर अतिरिक्त 0.52 टीएमसी पाण्यामधून उत्तर कोरेगाव भागातील कायम दुष्काळी असलेल्या 26 गावांना पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय योजनांच्या विविध लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात मानपत्र आणि लाभाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले तर आभार सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर यांनी मानले.

 
										 
 
		 
 
		 
		 
		