। लोकजागर । फलटण । दि. 9 नोव्हेंबर 2025 ।
“आपण कोणतीही उपासना किंवा पारायण मनापासून केल्यास, ग्रंथपाठाच्या प्रत्येक शब्दातून निर्माण होणारी शक्ती शरीर, मन, बुद्धी आणि अहंकार यावर मात करून आपल्याला सात्विकतेकडे नेते,” असे पुणे येथील कल्याणी नामजोशी यांनी गिरवी येथे झालेल्या प्रवचनात सांगितले.
गिरवी येथील श्री गोपालकृष्ण मंदिरात कार्तिकी एकादशीच्या पवित्र दिनानिमित्त संपूर्ण १८ अध्यायांचे श्रीमद् भगवद्गीता पठण, विष्णुसहस्रनाम पठण आणि तुलसी अर्चन या धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या दिव्य वातावरणामुळे परिसर मंगलमय आणि चैतन्यमय झाला.
कल्याणी नामजोशी यांनी सांगितले की, प्रत्येक साधकाने नियमितपणे गीतापठण किंवा इतर धर्मग्रंथांचे पठण केले, तर प्रत्येक मंत्राची ऊर्जा देह, श्वास आणि मनामध्ये प्रवेश करते. त्यामुळे आजच्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शनासाठी उपासना आणि पारायणाची गरज आहे.
‘कार्तिकी एकादशी’ या मंगल दिनी भगवान श्री गोपालकृष्णांची महापूजा अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. या दिव्य सोहळ्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता कल्याणी नामजोशी यांच्या सुश्राव्य प्रवचनाने झाली, ज्याचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला. त्यांनी गिरवी हे भगवान श्रीकृष्णाचे महत्त्वाचे वसतीस्थान असल्याचे सांगत, येथील भक्तीमार्ग प्रचारकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
नागपूर, संभाजीनगर, परभणी, सोलापूर, मुंबई, नाशिक आदी ठिकाणांहून आलेल्या भाविकांनी दर्शन घेतल्यानंतर अत्यंत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे विश्वस्त श्री जयंतराव देशपांडे आणि सौ. सुनिता देशपांडे यांनी केले.
